करंजेतील अग्रणी नदीपात्रात ट्रक उलटला : सुदैवाने चालक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 09:28 PM2019-09-26T21:28:47+5:302019-09-26T21:29:45+5:30
पहिल्यांदा डिझेल घेऊन आलेला मोठा टॅँकर या पर्यायी रस्त्यावरून पुढे निघून गेला. त्यामुळे सांगलीहून आलेल्या ट्रक चालकाने धाडस करून या रस्त्यावरील पाण्यात ट्रक घातला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पुढील बाजूकडून नदीपात्रातील खड्ड्यात पलटी झाला.
विटा : तासगावहून आटपाडीकडे इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाणारा ट्रक, पाण्यात गेलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने अग्रणी नदीपात्रात पलटी झाला. ही घटना गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करंजे (ता. खानापूर) येथे घडली. या अपघातात चालक दादासाहेब शंकर दोपटे (रा. जामखेड, जि. अहमदनगर) बचावले.
पुणे चाकण येथील बॉश कंपनीच्या गोदामामधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन आलेला ट्रक सातारा येथे माल उतरून सांगलीत आला. त्यावेळी ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आटपाडी येथे पोहोच करायची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चालक दोपटे ट्रक घेऊन तासगाव, वायफळे, करंजे, भिवघाटमार्गे आटपाडीकडे जात होते. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ट्रक करंजे गावानजीक वायफळे रस्त्यावर असलेल्या अग्रणी नदीजवळ आला. अग्रणी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी रस्ता तयार केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने पर्यायी रस्त्यावरही पाणी आले आहे.
पहिल्यांदा डिझेल घेऊन आलेला मोठा टॅँकर या पर्यायी रस्त्यावरून पुढे निघून गेला. त्यामुळे सांगलीहून आलेल्या ट्रक चालकाने धाडस करून या रस्त्यावरील पाण्यात ट्रक घातला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पुढील बाजूकडून नदीपात्रातील खड्ड्यात पलटी झाला. त्यावेळी तेथे असलेल्या स्थानिकांनी प्रसंगावधान राखून ट्रक चालकाला केबिनमधून बाहेर काढल्याने चालक बचावला. त्यानंतर नदीपात्रात पडलेला ट्रक जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. या अपघातात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.
करंजे येथील अग्रणी नदीपात्रात चालकाला पर्यायी रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक नदीपात्रात पलटी झाला.