ग्रामीण साहित्यातूनच कृषी संस्कृतीचे खरे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:08 AM2018-04-30T00:08:38+5:302018-04-30T00:08:38+5:30

The true philosophy of agricultural culture is only in rural literature | ग्रामीण साहित्यातूनच कृषी संस्कृतीचे खरे दर्शन

ग्रामीण साहित्यातूनच कृषी संस्कृतीचे खरे दर्शन

Next


आळसंद : महिलांचे प्रश्न आजपर्यंत पुरुषप्रधान साहित्यिकांनीच मांडले आहेत. शांताबाई शेळके, बहिणाबाई चौधरी यांच्यानंतर आज महिला साहित्यिक महिलांचे प्रश्न घेऊन पुढे येत आहेत. मात्र यासाठी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम बलवडी (भा.)च्या साहित्यप्रेमींनी उपलब्ध केले असून, याच ग्रामीण साहित्य संमेलनातून कृषी संस्कृतीचे दर्शन घडत असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले.
बलवडी (भा.) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी पत्रकार राही भिडे, सौ. समिता पाटील, हातकणंगलेच्या तहसीलदार वैशाली राजमाने, सौ. कोमल कुंदप, सौ. सीमा चव्हाण, पत्रकार प्राजक्ता ढेकळे, सरपंच प्रवीण पवार उपस्थित होते.
नवांंगुळ म्हणाल्या, सध्या महिला व अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारासंदर्भात जी वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत, त्यासंदर्भात खेद व्यक्त करतानाच, कोणती प्रतीके आपण स्वीकारायची हे ठरवले पाहिजे. डोके गुडघ्यात घालून बसलेली स्त्री रंगवली जाते. ही प्रतीके मोडीत काढण्याची गरज आहे.
राही भिडे म्हणाल्या, अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणजे ‘नाव मोठं लक्षण खोटं.’ जगात फक्त भारत देशातच जातीव्यवस्था असल्याने अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन जातीव्यवस्थेच्या अंगानेच होत असल्याचे लपून राहिले नाही. शूद्रादिशूद्र आणि बहुजनांची भाषा पटत नसल्याने त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याची व साहित्यकारांची दखल कधीच घेतली नाही; मात्र या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला शासन ५० लाखांचा निधी देते, मात्र ग्रामीण भागात होणाºया छोट्या-मोठ्या ग्रामीण साहित्य संमेलनांना कवडीचीही मदत होत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
यावेळी प्राजक्ता ढेकळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ग्रामीण साहित्यात महिलांंचे योगदान’ या विषयावरील परिसंवाद झाला. ढेकळे म्हणाल्या, खानापूर, आटपाडी या दुष्काळी तालुक्यातील ग्रामीण भागातील साहित्यिकांचे मोठे योगदान आहे. मात्र अनेक साहित्यिक कधीच प्रकाशात आले नाहीत. बलवडी (भा.) चे बाळकृष्ण बलवडीकर यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये क्रांतिगीतांच्या माध्यमातून लोकांना प्रेरित करण्याचे कार्य केले. करगणी येथील शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या ‘माझ्या जन्माची चित्रक हाणी’ आणि बेबीताई कांबळे यांच्या ‘जिणं आमचं’ या साहित्यकृती एक मापदंड ठरणार आहेत. शहाबाई यादव यांची क्रांतिगीतेसुध्दा स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांच्या चेतना जागृत करत होती. अशा उपेक्षित साहित्यिकांचं साहित्य समाजासमोर मांडण्याची गरज आहे.
यावेळी प्रा. सौ. सीमा चव्हाण व सौ. विद्या पवार यांनी ‘ग्रामीण साहित्यात स्त्रियांचे योगदान’ यावर आपले विचार मांडले.
प्रा. प्रशांत पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हसिना मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राचार्य मोहन राजमाने, उदय कुलकर्णी, उपसरपंच प्रसाद पवार, रमेश सावंत, कुसूम सावंत, बी. डी. कुंभार, नथुराम पवार, दीपक पवार, रामचंद्र कासकर, सौ. नीलम सूर्यवंशी, चंद्रकांत पवार यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. आभार संतोष जाधव यांनी मानले.
सांस्कृतिक दहशतवाद घातकच!
ग्रामीण साहित्यातूनच कृषी संस्कृतीचे खरे दर्शन घडते. ग्रामीण व शहरी समस्या वेगवेगळ्या आहेत. येथील कष्टकरी, श्रमिकांच्या समस्या साहित्याच्या माध्यमातून पुढे आल्या पाहिजेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ‘प्रतिसरकारच्या’ माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न केला. सध्या देशात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. त्याच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला पाहिजे. राजकीय, सामाजिक बदल होत असताना, नको त्या संस्कृतीचे उदात्तीकरण, तसेच वाढत चाललेला सांस्कृतिक दहशतवाद घातक असल्याचे नवांगुळ म्हणाल्या.

Web Title: The true philosophy of agricultural culture is only in rural literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.