तृप्ती पाटील यांचा राजीनाम्यास नकार
By admin | Published: March 14, 2016 10:57 PM2016-03-14T22:57:37+5:302016-03-15T00:10:41+5:30
इच्छुकांची गोची : मिरज पंचायत समिती उपसभापतिपदाची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता
मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीबरोबर उपसभापति-पदाची निवडही वादात सापडली आहे. उपसभापती तृप्ती पाटील यांनी राजीनाम्यास नकार दिल्याने नवीन उपसभापतिपदाची निवड रखडण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या राजीनाम्याच्या नकाराने इच्छुकांचीही गोची झाली आहे. उपसभापतींच्या राजीनाम्याबाबत नेते नेमकी कोणती भूमिका घेतात, यावरही निवडीचे भवितव्य अवलंबून आहे. तृप्ती पाटील या राजीनाम्यावर ठाम राहिल्यास उपसभापती निवडीवरून पंचायत समितीत गटबाजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिरज पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवड सदस्यांच्या विरोधामुळे गाजली. जयश्री पाटील यांना विरोध करणाऱ्या सदस्यांची संख्याही मोठी होती. नेत्यांच्या आदेशामुळे हा विरोध मावळला. सदस्यांना जयश्री पाटील यांना समर्थन देण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरला नाही. सभापतिपदाच्या निवडीनंतर सदस्यांना उपसभापतीचे वेध लागले आहेत. सभापती निवडीच्या गोंधळात इच्छुकांनी उपसभापतीपद मिळविण्यासाठी नेत्यांना साकडे घातले. नेत्यांनी वेळ मारून नेण्यासाठी इच्छुकांना उपसभापतिपदाची संधी देण्याचा शब्दही देऊन टाकला. तीन मागासवर्गीय सदस्यांपैकी एकास हे पद देण्याचे नेत्यांनी शब्द दिल्याची चर्चा आहे. मात्र सभापतिपदाच्या निवडीत पश्चिम भागावर अन्याय झालेच्या भावनेतून तृप्ती पाटील यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. पंचायत समितीत सभापती निवडीत पूर्व-पश्चिम असा समतोल होता. मात्र गत चार वर्षात माजी सभापती अशोक मोहिते यांचा अपवाद वगळता, सलग तिसऱ्यांदा पूर्व भागाला संधी देऊन सभापती निवडीत पश्चिम भागावर अन्याय झाला आहे. जयश्री पाटील यांना पाच महिन्यांच्या अटीवर सभापतीपद देण्यात आले आहे. पाच महिन्यानंतर पश्चिम भागाला न्याय मिळाल्यावर राजीनामा देण्याची भूमिका उपसभापती पाटील यांनी घेतल्याने इच्छुकांची गोची झाली आहे.
पाच महिन्यानंतर त्या राजीनामा देणार की नाही, हा विषय गुलदस्त्यात आहे. तृप्ती पाटील यांनी नेत्यांच्या आदेशापूर्वीच राजीनामा न देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास नवीन उपसभापती निवडीचा घोळ कायम राहण्याची शक्यता आहे. नेत्यांनीही उपसभापतीच्या राजीनाम्याबाबत मौन धारण केल्याने उपसभापतिपदाचा विषय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
कॉँग्रेस नेत्यांना इच्छुक भेटणार!
उपसभापतिपदासाठी नेत्यांनी शब्द दिल्याचा मागसवर्गीय सदस्यांचा दावा आहे. सभापती निवडीनंतर पार पडलेल्या मासिक सभेनंतर तृप्ती पाटील यांच्या राजीनाम्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. राजीनाम्यासाठी काँग्रेस नेत्यांना भेटण्याची तयारी मागासवर्गीय सदस्यांसह काही सदस्यांनी केली आहे.