आर्थिक संस्थांत पैशापेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व : दिलीप पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:24 AM2018-12-26T00:24:22+5:302018-12-26T00:24:33+5:30
सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था ...
सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था असल्या, तर त्या पैशावर कमी अन् विश्वासावर जास्त चालतात. त्यामुळे ग्राहकांचा, सभासदांचा आणि सर्व घटकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केले.
येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या २९ व्या वार्षिक अधिवेशनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील होते.
पाटील म्हणाले, कोणतीही आर्थिक संस्था अधिक कार्यक्षमपणे चालण्यासाठी त्या संस्थेच्या कारभारातील पारदर्शकता महत्त्वाची असते. कर्मचाऱ्यांची आत्मियता आणि विश्वास संपादन केल्यास अधिक प्रभावी काम होऊ शकतो. बॅँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक बॅँकांपैकी जिल्हा मध्यवर्ती बॅँक हा महत्त्वाचा दुवा आहे. या बॅँका टिकल्या तर शेतकरी टिकणार आहेत.
शेतकरी व त्यांचे अर्थकारण सांभाळण्याचे काम मध्यवर्ती बॅँका करत असतात. सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी, त्या योजना शेतकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकच महत्त्वाची ठरत असते. सहकारी बॅँकांना नोटाबंदीच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवरही मात करून बॅँकांनी आपली वाटचाल व्यवस्थीत सुरू ठेवली आहे.
यावेळी डॉ. जे. एफ. पाटील, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. संजय ठिगळे, डॉ. उल्हास माळकर, बी. जी. कोरे यांच्यासह चार जिल्ह्यांतून आलेले अर्थशास्त्राचे प्राध्यापक उपस्थित होते.
शेतकरी अडचणीत
दिनकर पाटील म्हणाले, शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात महत्त्वाची अडचण आर्थिक नियोजन हीच असते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी यावर अभ्यास करून मार्ग शोधावेत. आजचे तरूण शिक्षित होत असले तरी, त्यांना व्यवहारज्ञान असेलच असे नसल्याने, त्यावरही आता तज्ज्ञांना मोठे काम करावे लागणार आहे.
सांगली येथे शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशन समारोप समारंभात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.