मसुचीवाडी छेडछाडप्रकरणी तिघेजण पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: May 8, 2016 12:44 AM2016-05-08T00:44:23+5:302016-05-08T00:44:23+5:30
मसुचीवाडीची घटना : जयंतराव, सदाभाऊ पोलिस ठाण्यात
इस्लामपूर : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शाळेच्या मुलींच्या छेडछाडप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यातील इतर फरारींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. आ. जयंत पाटील यांनी पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांची भेट घेऊन गावगुंडांवर कारवाईची मागणी केली.
मसुचीवाडी व बोरगाव परिसरात दोन आणि तीन मे रोजी झालेल्या मारहाणप्रकरणी संतोष विष्णू पवार व प्रणव प्रदीप पवार (दोघे रा. मसुचीवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी सागर खोत, रोहित खोत आणि आप्पासाहेब बबलेश्वर (तिघे रा. बोरगाव) यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा तिघांविरुद्ध पोलिसांकडून रितसर गुन्ह्याची नोंद करून त्यांना अटक करण्याची कारवाई करण्याचे काम सुरू होते.
मसुचीवाडीतील हा खळबळजनक आणि संपूर्ण गावाला दहशतीखाली ठेवणाऱ्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आ. जयंत पाटील यांनी ग्रामस्थांसह पोलिस उपअधीक्षक कार्यालयात वैशाली शिंदे आणि पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याशी चर्चा केली. पोलिसांकडे आलेल्या तक्रारी आणि त्यांचे स्वरूप याबाबत माहिती घेतली. उपअधीक्षक शिंदे यांनी त्यांना या छेडछाडीबाबत अधिकृत तक्रार पोलिसांकडे येणे गरजेचे आहे. त्याशिवाय संबंधित संशयितांवर कारवाई करता येत नाही, ही बाब निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर आ. पाटील यांनी येथील ग्रामस्थांशी चर्चा करून अधिकृतपणे पोलिसांत फिर्याद देण्याची सूचना केली.
तसेच पोलिसांनी याप्रकरणी कसलीही हयगय न करता त्या गावगुंडांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात मसुचीवाडीसह परिसरातील मुलींना त्याचा पुन्हा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या. (वार्ताहर)
महिला आयोगाच्या अध्यक्षा येणार..!
मसुचीवाडी येथील मुलींची छेडछाड आणि त्यातून ग्रामसभेने मुलींना बोरगाव येथे शिकण्यासाठी न पाठवण्याचा केलेला ठराव अशा खळबळजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या मसुचीवाडी गावाला भेट देणार आहेत.
पोलिस गुंडगिरी मोडून काढतील : सदाभाऊ खोत
४मसुचीवाडीतील मुलींचे छेडछाड प्रकरण अमानवी आणि निषेधार्ह आहे. गावाने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून या संकटाचा मुकाबला करताना पिडित मुलींच्या कुटुंबाना आधार द्यावा, या तालुक्यातील अनेकांना राज्य व देशपातळीवर नेतृत्व केले आहे. मुली-महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत असताना त्यांची छेडछाड करणारी प्रवृत्ती ठेचून काढायला हवी. गुंडगिरीला लोकाश्रय आणि राजाश्रय मिळता कामा नये. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून, ही गुंडगिरी ते मोडून काढतील, असे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
४बोरगावच्या जि. प. सदस्या सौ. जयश्री जितेंद्र पाटील यांनी मसुचीवाडीच्या महाविद्यालयीन तरुणींवर झालेल्या अन्यायाचा निषेध केला आहे. छेडछाड करणाऱ्या गावगुंडांना पाठीशी घालणाऱ्यास शासन मिळावे. सर्व क्षेत्रात प्रगल्भ असणाऱ्या बोरगावात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वारंवार घडतात. गावातील काही सूज्ञ मंडळींनी सदरचे प्रकरण मिटवले त्यावेळीच या प्रवृत्तीला शासन मिळाले असते, तर हा प्रसंग घडला नसता. अशा प्रकारांना पोलिसांनी वेळीच आवर घालावा अन्यथा अन्यायग्रस्त मुलींसाठी प्रसंगी रस्यावर उतरू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला.
विनयभंगाचा गुन्हा दाखल
मसुचीवाडी येथील मुलींच्या छेडछाडप्रकरणी रात्री उशिरा एका पिडित मुलीने चौघांविरुध्द फिर्याद दिली आहे. त्यामध्ये रोहित ऊर्फ इंद्रजित प्रकाश खरात (वय २१), सागर प्रकाश खोत (२३), अमोसिध्द ऊर्फ आप्पासाहेब नरसाप्पा बबलेश्वर (२३), राजेंद्र विठ्ठल पवार-तपकिरे (३५, सर्व रा. बोरगाव) यांचा समावेश आहे. या सर्वांविरुध्द पोलिसांनी विनयभंग, छेडछाड व पाठलाग करणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील राजेंद्र पवार हा फरारी असून, इतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. विनयभंगाचा हा प्रकार गेल्या दहा महिन्यांपासून सुरू होता. मात्र याबाबत पिडित मुली, त्यांचे पालक अथवा ग्रामस्थांनी कल्पना दिली नव्हती. पोलिसांनी या प्रकारात क ोणतीही टाळाटाळ केलेली नाही. ग्रामसभेने केलेल्या ठरावातही पोलिसांना या घटनांची माहिती दिली नसल्याचे मान्य केले आहे, असे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.