वीस हजारावर जनावरांची हेळसांड
By admin | Published: January 6, 2015 10:44 PM2015-01-06T22:44:29+5:302015-01-06T23:59:22+5:30
दरीबडचीतील प्रकार : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांविना २७ लाखांचा ‘सुसज्ज’ दवाखाना
दरीबडची : दरीबडची (ता. जत) येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून अधिकाऱ्यांविना सुरू आहे. कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने २० हजार ३२९ जनावरांची हेळसांड सुरू आहे. लाळखुरकत, बुळकांडी, गोचिडताप, आंत्रविषार, गर्भतपासणी, जंतनिर्मूलन कार्यक्रम, कृत्रिम रेतन, गर्भ व वांझ तपासणी आदी रोगांची लस मोहीम शिबिरे होत नाहीत. कागदोपत्री शिबिरे उरकली जात आहेत. लाळखुरकत, आंत्रविषार आजारांनी १७ जनावरे दगावली आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. २७ लाख रुपये खर्चून उभारलेला सुसज्ज दवाखाना बंदच असल्याने शासनाचे पैसे वाया गेले आहेत.
पूर्व भागातील दरीबडची, पशुवैद्यकीय दवाखाना वर्ग-१ अंतर्गत दरीबडची, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, लमाणतांडा, पांढरेवाडी, दरीकोणूर, तिल्याळ या गावांचा समावेश आहे. खिलार जनावरांसाठी हा परिसर प्रसिध्द आहे. गाय, बैल, म्हैस, शेळ््या-मेंढ्यांची संख्या मोठी आहे. माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची पैदासही केली जाते.
दुग्धोत्पादन व्यवसायाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळला आहे. वारणा, राजारामबापू व खासगी संघांकडून दूधसंकलन केले जाते. जर्सी गाय, म्हैस यांची संख्या मोठी आहे. दवाखान्याचा हंगामी कार्यभार तिकोंडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डोळ्ळी यांच्याकडे आहे. दुसरीकडील कार्यभार असल्याने ते येथे येत नाहीत. डॉक्टरांअभावी दवाखाना बंद असतो. ,
पशुसंवर्धन विभागाकडून दवाखान्याची गोचीड निर्मूलन औषध, रेबीज लस, कॅल्शियम, अँटीबायोटिक, ‘अ’ जीवनसत्त्व कमतरतेची औषधे, सलाईन, जंत निर्मूलन औषधे आदी औषधे येतात; परंतु डॉक्टर नसल्याने ती तालुक्यामधून उचललीच जात नाहीत. महत्त्वाची औषधे येत नाहीत. कोणत्याच रोगावर इलाज केला जात नाही. त्यामुळे दवाखान्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. शेतकरी जनावरांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार करुन घेत आहेत. हे डॉक्टर भरमसाट फी घेऊन उपचार करीत आहेत. सध्या दरीबडची येथे लाळखुरकतची साथ सुरु आहे. बाळू गुगवाड यांच्या २, जोतिराम सावंत यांची १, तसेच मारुती सावंत यांच्या २ शेळ्या-मेंढ्या दगावल्या. डिसेंबरमध्ये शेळ्यांना आंत्रविषारची साथ आली होती. त्यामध्ये १२ शेळ्यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर दरीबडची, जालिहाळ, तिल्याळ येथे शिबिर घेण्यात आले. बाकीच्या गावांमध्ये शिबिरेच झाली नाहीत. (वार्ताहर)
सुसज्ज दवाखाना निंरूपयोगी
गावाशेजारी जालिहाळ रस्त्यावर फॉरेस्टजवळ २७ लाख रुपये खर्चून सुसज्ज दवाखाना उभारण्यात आला आहे. डॉक्टर, कर्मचारी निवास, औषध भांडारगृह, दवाखाना खोली अशा इमारती बांधल्या आहेत. सभोवती कंपाऊंड आहे. वीजपुरवठा आहे. कूपनलिका खोदली आहे. परंतु येथे कोणीच वास्तव्य करीत नाही. येथे कायमस्वरुपी स्वतंत्र पशुवैद्यकीय डॉक्टरची नेमणूक करण्याबाबतची मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी पशुसंवर्धन विभाग व पंचायत समितीकडे केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एल. अघाव यांनी, दवाखान्याचा अधिभार डॉ. डोळ््ळी यांच्याकडे आहे. त्यांना उपस्थित राहण्यास सांगतो, असे थातुरमातुर उत्तर दिले.
दवाखान्यात डॉक्टर नसल्याने जनावरांवर वेळेत उपचार होत नाहीत. लस मोहीम शिबिरे होत नाहीत. रोगाच्या साथीने जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांच्या जनावरांसमोर संकट उभे आहे. केवळ सुसज्ज दवाखाना बांधून उपयोग होत नाही, तेथे कायमस्वरुपी डॉक्टरची नेमणूकही करावी, अशी आमची मागणी आहे.
- बाळू गुगवाड, शेतकरी
जनावरांची संख्या
गाई - बैल - ६ हजार ३४७
म्हैशी - १ हजार ४१२
शेळ्या-मेंढ्या - १२ हजार ५७0
कोंबड्या - १0 हजार ६६२