गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीत हळदीचे सौदे, आवक वाढल्याने दरावर परिणाम
By अशोक डोंबाळे | Published: March 22, 2023 05:51 PM2023-03-22T17:51:48+5:302023-03-22T18:01:00+5:30
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक
सांगली : येथील मार्केट यार्डात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघालेल्या हळदीच्या सौद्यामध्ये १८ हजार पोती हळदीची आवक झाली होती. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होत आहे. आवक वाढल्याचा दरावर परिणाम झाला आहे. क्विंटलला पाच ते सात हजारापर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मार्केट यार्डात बुधवारी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवंसे, बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, हळद व्यापारी मनोहर सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सौदे निघाले. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या सौद्यात १८ हजार पोती हळदीचे सौदे निघाले. कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक सीमा भागातून सध्या राजापुरी हळद मोठ्या प्रमाणात येत आहे. परराज्यातूनही रोज चार ते पाच हजार पोती हळद येत आहे. दरवर्षीपेक्षा उत्पादन जास्त असल्यामुळे आवक वाढल्याचे दिसत आहे. आवक वाढली असल्याने दरावर परिणाम झाला आहे.
दर टिकून
सध्या बाजारात हळदीची आवक वाढली असून देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात हळदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे हळदीचे दर टिकून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
दिवसातून दोनदा सौदे
बाजार समितीत आजअखेर अंदाजे ५ लाख २५ हजार पोत्यांची विक्री झाली आहे. सकाळी राजापुरी आणि संध्याकाळी परराज्यातील असे दिवसातून दोन वेळा सौदे होत आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघालेल्या हळद सौद्यात बुधवारी १८ हजार पोत्यांची आवक झाली होती. मोठ्या आणि लाल हळदीला (लगडी) प्रतिक्विंटल १० ते १४ हजार रुपयांपर्यंत दर मिळतो; पण ती हळद हजारात एखादा क्विंटलच आहे. -मनोहर सारडा, हळद व्यापारी.