कोरोनातही हळद, गूळ, धान्याची पाच कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:16+5:302021-04-24T04:27:16+5:30
सांगली : कोरोनाचा फैलाव सुरू असतानाही सुरक्षित अंतर ठेवून सांगली मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी हळद, गूळ आणि धान्याचे सौदे चालू ...
सांगली : कोरोनाचा फैलाव सुरू असतानाही सुरक्षित अंतर ठेवून सांगली मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी हळद, गूळ आणि धान्याचे सौदे चालू ठेवले आहेत. दिवसाला पाच कोटींची उलाढाल होत आहे. हळदीचा दर स्थिर असून, गुळाचे दर मात्र कमीच राहिले आहेत.
सांगली मार्केट यार्डात हळद, बेदाण्याचा हंगाम असून, देशभरातून व्यापारी येत आहेत. काही व्यापाऱ्यांनी ऑनलाईन व्यवहार करून मालाची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेदाणा असोसिएशनने सौदे बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हळद, गूळ आणि धान्याचे सौदे मात्र नियमित निघत आहेत. शुक्रवारी गुळाची १७३१ क्विंटल आवक झाली होती. प्रतिक्विंटल ३२३८ ते ३५५५ रुपये दर मिळाला. हळदीची आवक वाढली असून, १३,१२७ क्विंटल आवक झाली होती. प्रतिक्विंटल ७५०० ते १३,६०० रुपये दर मिळाला. सरासरी १० हजार ३०० पर्यंत दर मिळाला आहे. ज्वारी, गहू, हरभरा, उडीद, मुगाचीही आवक चांगली आहे.
चौकट
शेतकऱ्यांसाठी व्यापार चालू ठेवला पाहिजे : शरद शहा
गेल्या वर्षापासून कोराेनाचे संकट जगावर आहे. दक्षता शंभर टक्के घेतली पाहिजे. पण, व्यापार बंद राहिल्यास रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचा शेतीमाल विकला जाणार नाही. गर्दी टाळून आणि सुरक्षित अंतर ठेवून हळद, गूळ आणि धान्याचा बाजार सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी व्यापार चालू राहिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी व्यक्त केली.