हळद संशोधन समितीचा शेतकऱ्यांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:24 AM2021-04-12T04:24:41+5:302021-04-12T04:24:41+5:30
विटा : हळद उत्पादनानंतर त्यावर प्रक्रिया करणे व बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ...
विटा : हळद उत्पादनानंतर त्यावर प्रक्रिया करणे व बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्य शासनाने हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या हळद संशोधन व प्रक्रिया समितीत काम करण्याची नूतन पदाधिकाऱ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली या समितीचा हळद उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, असे मत कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनाला सल्ला देण्यासाठी सरकारने गठित केलेल्या हळद संशोधन व प्रक्रिया धोरण समितीच्या संचालकपदी मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील प्रगतशील शेतकरी सुभाष तुकाराम मोहिते यांची निवड झाल्यानंतर त्यांचा कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आंबीटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार उपस्थित होते.
भुसे म्हणाले, हळद पिकाच्या लागवडीपासून ते त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या प्रवासापर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्याबाबत समिती गठित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे खा. पाटील यांच्याच अध्यतेखाली ही अभ्यास समितीचे गठन करण्यात आले आहे. त्यामुळे नूतन संचालकांनी आपल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा. या समितीचे संचालक सुभाष मोहिते यांनी राज्यात हळद उत्पादन वाढीसाठी तसेच शेतक-यांना पायाभूत सुविधा देण्याबरोबतच हळद प्रकिया, शीतगृह उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास इस्लामपूरचे नगरसेवक प्रदीप लोहार, सुभाष जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदकुमार नीळकंठ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो : ११०४२०२१-विटा-सत्कार
ओळ : मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील शेतकरी सुभाष मोहिते यांची हळद संशोधन समितीच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांचा कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आंबिटकर, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, प्रदीप लोहार, नंदकुमार नीळकंठ उपस्थित होते.