हळद व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना घातला दोन कोटींचा गंडा, अटकेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा शंखध्वनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 17:14 IST2022-07-23T17:13:56+5:302022-07-23T17:14:18+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढून सारडांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन केले.

हळद व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना घातला दोन कोटींचा गंडा, अटकेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा शंखध्वनी
सांगली : सांगलीतील वाखरभागमधील हळद व्यापारी राजकुमार सारडा यांनी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढून सारडांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन केले. शेतकऱ्यांनी ठिय्या मारला होता. तत्काळ पैसे दिले नाही तर सारडा यांच्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पटेल चौकातून मोर्चाची सुरुवात झाली. सारडा यांच्या निषेधाच्या घोषणा देत वखारभागमधील त्यांच्या बंगल्यासमोर मोर्चा आल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शंखध्वनी आंदोलन केले.
यावेळी झालेल्या सभेत महेश खराडे म्हणाले की, सारडा यांनी चार वर्षांपूर्वी वाई, कोरेगावसह सातारा जिल्ह्यातील २०० शेतकऱ्याची हळद खरेदी केली. सर्व शेतकऱ्यांची सुमारे दोन कोटी रुपये इतकी रक्कम आहे. गेल्या चार वर्षांत एक रुपयाही सारडा यांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वटलेच नाहीत. या व्यापाऱ्याच्या मनमानीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सारडा यांनी तात्काळ पैसे द्यावेत अन्यथा घरात ठिय्या मारू, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी महेश जगताप, संदीप शीरोटे, रितेश साळोखे, शशिकांत जाधव, राहुल साबळे, रमेश भोसले, रवींद्र बोराटे, विजय धनवडे, जयवंत मटकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.