बारावी व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी जातपडताळणी करून घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:46+5:302021-02-12T04:24:46+5:30
सांगली : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज करताना जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे ...
सांगली : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज करताना जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात बारावी विज्ञान व डिप्लोमाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आताच जातपडताळणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जातपडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संभाजी पोवार यांनी आवाहन केले की, विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या महाविद्यालयाच्या शिफारशीसह ३१ मार्चपर्यंत सादर करावेत. शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थी व पालकांत जागरूकता निर्माण करून अर्ज सादर करण्याच्या सूचना द्याव्यात. तसे केल्यास ऐनवेळेस विद्यार्थी व पालकांची धांदल होणार नाही. समितीकडूनही वेळेत पडताळणी प्रमाणपत्र देता येईल. बहुतांश विद्यार्थी बारावीच्या परीक्षेनंतर किंवा निकालानंतर अंतिमक्षणी प्रस्ताव देतात. यावर्षी तसे चालणार नसल्याचे पोवार यांनी स्पष्ट केले.
चौकट
अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारस पत्र, प्राचार्यांच्या सही-शिक्क्यासह १५ अ फॉर्म, बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक पुरावे व विहीत नमुन्यातील शपथपत्रासह मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहेत. त्याच्या झेरॉक्स साक्षांकित प्रती समितीकडे सादर करायच्या आहेत. उमेदवाराने ई-मेल आयडी नोंदवणे आवश्यक आहे.
------