सांगलीत सव्वाबारा लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:28+5:302021-04-21T04:27:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी असतानाही गोवा मेड बनावट दारूची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी असतानाही गोवा मेड बनावट दारूची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहरात तीन वाहनांतून सव्वाबारा लाख रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
संजयकुमार व्यंकाप्पा शेरगे (२७), मेहबुब अब्दुल पिरखान (२७), आतिश शरद सरोदे (३२) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संचारबंदीच्या काळात अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रभारी निरीक्षक संजय वाडेकर हे शहरातील शामरावनगर परिसरात सिद्धिविनायक चौकात गस्त घालत होते. यावेळी गोवा मेड बनावट दारू विक्रीसाठी शहरात आणली जात असल्याची माहिती मिळाली. भरारी पथकाने छापा टाकून एक पिकअप गाडीसह दोन चारचाकी वाहनांची तपासणी केली. या वाहनातून विदेशी मद्याच्या ७५७ बाटल्या तर बिअरच्या १२३ बाटल्या अशा १२ लाख ६४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तीनही संशयितांवर गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई प्रभारी निरीक्षक एस. एम. वाडेकर, डाॅ. उमा पाटील, संतोष थोरात, श्रीपाद पाटील, संतोष बिराजदार, जयसिंग पावरा, पी. एस. बिरुणगी, अर्जुन कोरवी यांच्या पथकाने केली.
चौकट
कडक कारवाई करू : देशमुख
जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. अशा काळात बनावट मद्याची वाहतूक, बेकायदेशीर मद्याची विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनीही बनावट मद्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी केले.