बत्तीस गुंठ्यात टोमॅटोचे पंचवीस लाखाचे उत्पन्न
By Admin | Published: June 30, 2016 11:14 PM2016-06-30T23:14:36+5:302016-06-30T23:34:10+5:30
बेळंकीच्या शेतकऱ्याची यशोगाथा : नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून घडविली किमया... --महाराष्ट्र कृषिदिन विशेष
मोहन मगदूम--लिंगनूर --टोमॅटोचे दर चढेच असल्यामुळे उत्पादक खूश आहेत. बेळंकी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकऱ्यास ३२ गुंठे क्षेत्रातील टोमॅटो तब्बल पंचवीस लाखाचे उत्पन्न देत आहे.
मेहनत, बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास शेतीवर येणाऱ्या संकटांवर मात करता येते, हे बेळंकीच्या सुखदेव कोरे या प्रगतशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्यांनी केवळ ३२ गुंठे क्षेत्रात आतापर्यंत वीस लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यापुढे अजून पाच लाखाचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. विशेष म्हणजे कोरे यांनी हे उत्पन्न मिळवले आहे, ते खडकाळ माळरानावरील जमिनीतून! त्यासाठी आधुनिक शेतीपद्धत आणि शेडनेटचा वापर फायदेशीर ठरला आहे.
बेळंकीपासून पाच किलोमीटरवर असलेल्या माळरानावर कोरे यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. त्यांना सुरुवातीस शेतीतून फारसे उत्पादन मिळाले नाही. पाण्याची कमतरता आणि अपुरे भांडवल याचा फटका बसत होता. मात्र त्यांनी शेतीत प्रयोग करणे सुरू ठेवले. सुरुवातीला एक एकर ढबू मिरचीची लागवड केली. त्यावेळी बाजारभाव पडल्याने जेमतेम उत्पादन मिळाले.
मग मार्च महिन्यात ३२ गुंठे जमिनीत ठिबक व मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटोची लागवड केली. पाच फुटावर सरी व दहा इंच अंतरावर रोप याप्रमाणे नऊ हजार रोपांची लावण केली. उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा फटका अनेकांना बसला, पण कोरे यांनी मल्चिंग पेपर व शेडनेट या तंत्रज्ञानाचा वापर करून टोमॅटो वाचवण्यात यश मिळवले. गेल्या तीन आठवड्यांपासून तोडणी हंगाम सुरू झाला आहे. गेल्या पंधरवड्यात कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीच्या बाजारपेठेत टोमॅटो पाठवण्यात आला. सुरुवातीस ५० रुपयेप्रमाणे दर मिळाला. आता मुंबई, अहमदाबाद बाजारपेठेत टोमॅटो पाठवण्यात येत आहे. तेथेही ७० ते ८० रुपये दर मिळाला. सध्या दर थोडा कमी झाला आहे. एकूण ७० टन उत्पादन निघण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यातून पंचवीस लाखाचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोरे यांनी दुसऱ्या ३० गुंठ्याच्या क्षेत्रात ढबूची लागण केली असून त्याला चांगली मागणी आहे. गतवर्र्षी ढब्बूला पाच रुपये किलो दर मिळाला होता. दर घसरले म्हणून निराश न होता त्यांनी नव्या जोमाने परत ढबूची लागण केली आहे. सध्या त्याचा दर ४५ ते ५० रुपयेपर्यंत आहे.
बत्तीस गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लावण करून जास्तीत जास्त उत्पादन व दर घेण्यात यशस्वी झालो. बाजारपेठेचा अभ्यास व पिकाची काळजी घेतल्यास शेतकऱ्याला निश्चित फायदा होतो.
- सुखदेव कोरे,
टोमॅटो उत्पादक, बेळंकी