देवनगरला बस उलटून पस्तीस विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:52 PM2019-09-18T23:52:11+5:302019-09-18T23:52:16+5:30

विटा : विट्याहून वाळूजकडे अरूंद रस्त्याने निघालेल्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस नाल्यात उलटून ३५ शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी ...

Twenty-five students were injured when a bus overturned in Devnagar | देवनगरला बस उलटून पस्तीस विद्यार्थी जखमी

देवनगरला बस उलटून पस्तीस विद्यार्थी जखमी

Next

विटा : विट्याहून वाळूजकडे अरूंद रस्त्याने निघालेल्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस नाल्यात उलटून ३५ शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास देवनगर (ता. खानापूर) गावाजवळ सांगोले रस्त्यावर घडली.
दरम्यान, बस उलटलेल्या ठिकाणापासून पुढे केवळ दहा फुटावर खोल विहीर होती. बस आणखी काही अंतर पुढे गेली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. याप्रकरणी संतप्त पालकांनी बसचालक तुकाराम शिंदे यांच्याविरुध्द बुधवारी रात्री उशिरा विटा पोलिसांत फिर्याद दिली.
खानापूर तालुक्यातील भांबर्डे व देवनगर येथील शालेय विद्यार्थी वाळूज विद्यालयात शिक्षण घेतात. बुधवारी सकाळी ९.३० वाजता विटा आगाराची विटा ते वाळूज ही बस (क्र. एमएच १२ सीएच ७५८३) आगारातून वाळूजकडे निघाली होती. सकाळी पावणेदहा वाजता भांबर्डे व देवनगर येथील ४१ विद्यार्थी घेऊन बस सांगोलेमार्गे वाळूजकडे जात होती. बस देवनगर गावाजवळच वळणावर असलेल्या अरूंद रस्त्यावर असताना समोरून येणाऱ्या टेम्पोला बाजू देण्याच्या प्रयत्नात चालक तुकाराम शिंदे यांचा बसवरील ताबा सुटला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाच फूट खोल नाल्यात उलटली. त्यावेळी बसमध्ये ४१ शालेय विद्यार्थी होते. बस वाहकाच्या बाजूला नाल्यात उलटल्याने चालकाच्या पाठीमागे बसलेले सर्व विद्यार्थी वाहकाच्या बाजूला असलेल्या मुलांच्या अंगावर पडले. प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने तात्काळ मुलांना बसमधून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच युवा नेते सुशांत देवकर, सरपंच सचिन शेंडे व मुख्याध्यापक विजयसिंह गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मुलांना उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दुपारी आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली होती. उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

रुंदीकरण करणार...
दरम्यान, देवनगर येथे असलेला अरूंद रस्ता रूंदीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्याची पाहणी केली आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले.

अरूंद रस्त्यामुळे अपघात
देवनगर ते सांगोले हा रस्ता अत्यंत अरूंद आहे. गेल्या चार वर्षांपूर्वीही याचठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी रस्ता रूंदीकरणाची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा अपघात झाला असल्याची प्रतिक्रिया सांगोलेचे माजी सरपंच सुशांत देवकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Twenty-five students were injured when a bus overturned in Devnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.