पंचवीस हजारात दुचाकी देण्याची नवी शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:01 AM2019-06-13T00:01:56+5:302019-06-13T00:04:12+5:30
चारचाकी, दुचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी विविध फायनान्स कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. परंतु विविध कंपन्यांच्या दुचाकी वाहनांना ग्राहक नसल्याने एका फायनान्स कंपनीने, २५ हजार रुपये रोख भरा आणि दुचाकीचे मालक व्हा, बाकीचे हप्ते आम्ही भरतो,
अशोक पाटील ।
इस्लामपूर : चारचाकी, दुचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी विविध फायनान्स कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. परंतु विविध कंपन्यांच्या दुचाकी वाहनांना ग्राहक नसल्याने एका फायनान्स कंपनीने, २५ हजार रुपये रोख भरा आणि दुचाकीचे मालक व्हा, बाकीचे हप्ते आम्ही भरतो, अशी नामी शक्कल लढवली आहे. या योजनेकडे बरेच ग्राहक आकर्षित झाले आहेत. ही योजना साखळी पध्दतीने असून यामध्ये फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
विविध फायनान्स कंपन्यांकडून, एक रुपया भरा आणि चारचाकी गाडी घेऊन जा, अशाही योजना राबविल्या जात आहेत. याकडेही ग्राहक चांगलाच आकर्षित होत आहे.
अशाच पध्दतीने स्टार नामक कंपनीने, २५ हजार रुपये रोख भरा आणि कोणत्याही कंपनीची दुचाकी घेऊन जा, पुढील हप्ते आम्ही भरू, त्यापोटी २५ हजार रुपये भरून गाडी नेणारे तीन ग्राहक मिळवून द्यावयाचे आहेत. हे जमले नाही, तर व्याजासहीत पूर्ण गाडीची रक्कम वसूल केली जाईल, अशी योजना जाहीर केली आहे.
या योजनेकडे ग्राहक आकर्षित झाला आहे. सध्या वाहनांच्या बाजारात नवीन आणि जुन्या गाड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा गाड्या घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. यासाठीही फायनान्स कंपन्यांबरोबरच दुचाकी वाहनांच्या कंपन्यांनीही, विक्री वाढावी यासाठी विविध योजनांतून जाहिरातबाजी सुरू केली आहे.
सुरुवातीच्या काळात नामवंत कंपन्यांच्या दुचाकी घेणेही मुश्किल होते. दोन ते तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गाडी ताब्यात मिळत होती. पण सध्याची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. प्रत्येक घरात किमान दोन दुचाकी आहेत. दिवसेंदिवस दुचाकी विक्रीवर मोठा परिणाम दिसत आहे. त्यामुळेच काही खासगी फायनान्स कंपन्यांनी विविध योजना राबवून बाजार मांडला आहे. २५ हजार रुपये भरुन तीन ग्राहक आणण्याची योजना यापैकीच आहे. त्याला अनेकजण बळी पडत आहेत. दुचाकी निर्मिती करणाºया कंपन्यांचा आणि या योजनेचा काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे.