सांगली महापालिका पंचविशीत, पावले बाल्यावस्थेतच; समस्या ‘जैसे थे’
By शीतल पाटील | Published: February 4, 2023 05:54 PM2023-02-04T17:54:25+5:302023-02-04T17:55:02+5:30
कारभारी, प्रशासन, लोकप्रतिनिधी स्वप्नरंजनात मग्न, शहरातील समस्या ‘जैसे थे’
शीतल पाटील
सांगली : शिवसेना-भाजप युतीच्या काळात १९९८ मध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची मिळून महापालिका स्थापन करण्यात आली. तिन्ही शहरांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चेहरा वेगळा होता. समस्याही भिन्न होत्या. तरीही गेल्या पंचवीस वर्षांत महापालिकेचा गाडा चालविताना तिन्ही शहरांतील कारभाऱ्यांनी एकत्र काम केले. मर्यादित उत्पन्नामुळे विकासाला गती मिळालेली नाही. शासन निधीवर भरवसा ठेवावा लागतो.
महापालिका क्षेत्रात पंचवीस वर्षांतील समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न तोकडे पडले. इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्यात गुंतागुंतच अधिक झाली. विकास कामांना गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मतभेद बाजूला ठेवले पाहिजे.
ड्रेनेज योजना दहा वर्षे रखडलेली, पाणी योजनांचे नळ कोरडे!
सांगली व मिरजेसाठी ११४ कोटीच्या ड्रेनेज योजनेला २०१३ मध्ये सुरुवात झाली. दहा वर्षांत योजना पूर्ण झालेली नाही. अजूनही सांगली व मिरजेतील कामे शिल्लक आहेत. त्याबाबत कोणालाच गांभीर्य नाही. आता ही योजना २०० कोटींच्या पुढे गेली आहे. सांगली व मिरज आणि कुपवाडमधील पाणी योजना पूर्ण झाल्या. पण नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्थापनेला ९ फेब्रुवारी रोजी पंचवीस वर्षे होत आहेत. रौप्यमहोत्सव साजरा करणारी महापालिका कागदावर तरुणपणाकडे वाटचाल करीत असली तरी पावले मात्र बाल्यावस्थेतच पडत आहेत. शहरातील समस्या ‘जैसे थे’ आहेत. कारभारी, प्रशासन, लोकप्रतिनिधी स्वप्नरंजनात मग्न आहेत. याचा आढावा घेणारी मालिका आजपासून...
गुंठेवारीचा संघर्ष कायम
महापालिकेचा विस्तार ११८ चौरस किलोमीटरचा आहे. त्यात गुंठेवारी क्षेत्र सर्वाधिक आहे. गुंठेवारी नियमितीकरणाच्या नावाखाली नागरिकांकडून महसूल गोळा करण्यात आला; पण तो अन्यत्र खर्च केल्याने गुंठेवारी भाग सोयी-सुविधांपासून वंचित राहिला. रस्ते, गटारी, सांडपाणी, डासांचा उच्छाद, झाडेझुडपे, महापुराची छाया अशा अनेक समस्यांशी गुंठेवारी भाग संघर्ष करीत आहेत.
शेरीनाला आणि कृष्णा नदी प्रदूषण
शेरीनाल्यावर बरेच राजकारणही खेळले गेले. २००३-०४ मध्ये २५ कोटी रुपये खर्चाचा शेरीनाल्याच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. तो कसाबसा पूर्ण झाला; पण आजही शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीपात्रात मिसळत असते. जीवनदायी कृष्णा नदी प्रदूषित करण्याचे सर्वांत मोठे पाप महापालिकेच्या माथी आहे. आता नव्याने शेरीनाल्यावर एसटीपी (शुद्धिकरण प्रकल्प) उभारला जाणार आहे. त्यासाठी ६७ कोटींचा आराखडा तयार केला आहे.
काळ्या खणीचे पर्यटनस्थळ : नुसत्याच पोकळ घोषणा
सांगली शहरात कृष्णा घाट, गणपती मंदिर परिसर वगळता, एकही पर्यटनस्थळ नाही. शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या काळ्या खणीच्या स्वच्छतेपासून बोटिंगपर्यंतचे नियोजन केले आहे. पंधरा दिवसांत बोटिंग सुरू करण्याची घोषणा झाली. त्याला आता फेब्रुवारीत वर्ष पूर्ण झाले, पण अजूनही कशाचाच पत्ता नाही.
घनकचऱ्यातून निघतोय नेहमीच सोन्याचा धूर
घनकचऱ्याचा विषय तर हरित न्यायालयापर्यंत गाजला. प्रकल्प पूर्ण करण्यात महापालिकेला अपयश आले. समडोळी व बेडग रस्त्यावर हजारो टन कचरा साचून आहे. दररोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. घनकचऱ्यातून सोन्याचा धूर काढण्याची वृत्ती घातक ठरली आहे. फेरनिविदा काढली असली तरी त्यातूनही संशयाचा धूर येत आहे.
बहुमजली पार्किंग इमारतीची निव्वळ चर्चा
शहरात पार्किंगच्या जागांचा विकास झालेला नाही. मुख्य बाजारपेठेतील दोन जागांवर बहुमजली पार्किंग इमारतीची निव्वळ चर्चा आहे. फुटपाथ, मुख्य चौक, रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे.