चोवीस गावे हागणदारीमुक्त

By admin | Published: October 13, 2015 10:15 PM2015-10-13T22:15:11+5:302015-10-13T23:53:46+5:30

तासगाव पंचायत समिती : १७ हजार कुटुंबे शौचालयाशिवाय

Twenty-four villages are hawkers-free | चोवीस गावे हागणदारीमुक्त

चोवीस गावे हागणदारीमुक्त

Next

दत्ता पाटील-- तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे तालुक्यातील तब्बल २४ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. चार महिन्यांत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ९९४ कुटुंबांना शौचालय उभारणीसाठी १ कोटी १९ लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. तालुक्यात शौचालय नसलेली अद्यापही १७ हजार ४०९ कुुटुंबे आहेत.
गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तासगाव तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबवले. गावन्गाव पिंजून काढले. शौचालयाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवली. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्याला १२ हजार रुपयांचे अनुदान तातडीने देण्याची सोय केली. त्यामुळे चार महिन्यांत ९९४ कुटुंबांनी शौचालय बांधून एक कोटीच्यावर अनुदान घेतले. या विशेष मोहिमेमुळे तालुक्यातील २४ गावे हागणदारीमुक्त झालेली आहेत. तालुक्यातील अन्य गावांचा पंचायत समितीमार्फत सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार इतर गावांत अद्याप १७ हजार ४०९ कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा नाही. या कुटुंबांनीही शौचालय बांधावेत, यासाठी पंचायत समितीकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
तालुक्यातील ३९ गावांत ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. यापैकी बहुतांश गावांत हागणदारीमुक्तीची फज्जा ऊडालेला आहे. निवडणुकीसाठी सध्या या गावांत शहकाटशह, कुरघोडीचे राजकारण जोरात सुरु आहे. मात्र या निवडणुकीत हागणदारीमुक्तीचा अजेंडा जाहीरनाम्यात दिसून येत नाही. त्यामुळे गावकारभाऱ्यांची ऊदासीनताही हागणदारीमुक्तीला अडसर ठरत असल्याचे चित्र आहे.


पदाधिकाऱ्यांची उदासीनता
तालुक्यातील ६९ गावांपैकी २४ गावे हागणदारीमुक्त झाली असली, तरी इतर गावांत हागणदारीची मोठी समस्या आहे. या गावात शौचालयांचा प्रश्न मार्गी लागल्यास, तालुका हागणदारीमुक्त होणार आहे. मात्र पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांचे त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. शासनाचा निधी आपल्याच विभागात मिळावा, यासाठी अट्टाहास धरणारे सदस्य हागणदारीमुक्तीसाठी उदासीन असल्याचे दिसून येते.

हागणदारीमुक्त झालेली गावे
लोढे, गोटेवाडी, कचरेवाडी, मतकुणकी, बिरणवाडी, नागेवाडी, वाघापूर, भैरववाडी, डोर्ली, पानमळेवाडी, विजयनगर, लोकरेवाडी, ढवळी, लिंंब, मोराळे (पेड), बेंद्री, किंदरवाडी, धोंडेवाडी, नरसेवाडी, यमगरवाडी, योगेवाडी, आरवडे, शिरगाव (क.), यमगरवाडी.

Web Title: Twenty-four villages are hawkers-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.