बारा गुंठ्यात २५ आंब्यांच्या झाडाची बाग । कासेगावच्या निवृत्त शिक्षकाने जपला छंद, कष्टाला यशाचे कोंदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:10 PM2019-06-15T23:10:24+5:302019-06-15T23:13:34+5:30
व्यापाऱ्यांना विक्री नाही -- सर्वसामान्य लोकांना हे आंबे माफक दरात मिळावेत म्हणून रघुनाथ निकम यांनी आजअखेर कोणत्याही व्यापाºयाला विक्री केलेली नाही. दरवर्षी त्यांना खर्च वजा जाता एक लाख रुपयापेक्षा जास्त नफा मिळतो. ही ‘आमराई’ त्यांना उतारवयातही जगण्याची नवी उमेद व प्रेरणा देत आहे.
प्रताप बडेकर ।
कासेगाव : छंद जपला की जीवनात नवी चेतना व उत्साह येत असतो. अशाच छंदातून कासेगाव (ता. वाळवा) येथील निवृत्त शिक्षकाने घरालगत १२ गुंठे जागेत पंचवीस आंब्यांची बाग लावली आहे. या आंब्यांच्या झाडांपासून त्यांना वर्षाकाठी एक लाख रुपयापेक्षा जास्त नफा मिळतो. आंबे चवीला अतिशय गोड असल्याने परिसरातून मोठी मागणीही आहे.
रघुनाथ मारुती निकम (वय ८०, रा. कासेगाव) असे त्यांचे नाव आहे. कासेगाव येथील नवीन महाविद्यालय रस्त्यालगत त्यांचे घर आहे. या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी १९८० मध्ये २५ आंब्याची कलमी रोपे लावली. यामध्ये २० रोपे केशर व पाच रोपे हापूस आंब्याची होती. दोन वर्षांनंतर त्या झाडांना आंबे लागण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कमी प्रमाणात आंबे लागले होते, मात्र तीन वर्षांनंतर भरपूर प्रमाणात आंबे लागण्यास सुरुवात झाली.
आता दरवर्षी प्रत्येक झाडापासून १००० पेक्षा जास्त आंबे मिळत आहेत. सर्व मिळून वर्षाला ३० हजारावर आंबे मिळतात. हे सर्व आंबे घरातच नैसर्गिकरित्या पिकवले जातात. त्याची विक्रीही घरातूनच होते. परिसरातील लोकांना या आंब्याची चव व प्रत माहिती असल्याने ते घरी येऊन घेऊन जातात. निकम यांनी लहानपणापासूनच असलेल्या निसर्ग, झाडांचे संगोपनाच्या आवडीला कृतीत उतरविले.