जत तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस, बिळूरमध्ये दोन एकर द्राक्षबाग कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:42 PM2022-04-06T18:42:54+5:302022-04-06T18:43:22+5:30
संख : सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज, बुधवारी जत तालुक्यातील बिळूर, येळदरी, मल्लाळ ...
संख : सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज, बुधवारी जत तालुक्यातील बिळूर, येळदरी, मल्लाळ या परिसरात वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. यामुळे बिळूर येथील भैरापा हुचापा करेणावर व सिद्राया हुचापा करेणावर यांची दोन एकर सामाईक द्राक्षबाग कोसळली. बागेचे अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाले. तसचे अन्य एका ढाब्याचे छत उडून गेले.
तालुक्याच्या उत्तर भागातील बिळूर, येळदरी, मल्लाळ येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काल, मंगळवारीही या परिसरात पावसाने हजेरी लावली होती. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसाने गारवा मिळाला आहे. मात्र आंबा, द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
बिळूर येथील भैरापा हुचापा करेणावर व सिद्राया हुचापा करेणावर या दोन सख्ख्या भावांची दोन एकर द्राक्षबाग गावाच्या उत्तरेला आहे. मंडप सिस्टीमवर ही द्राक्षबाग आहे. बागेतील माल परिपक्व झाला होता. आठ दिवसात विक्री होणार होती. परंतु हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हताश झाला आहे.