महिलेस गर्भलिंग निदानास आणणारे दोन एजंट ताब्यात - सांगलीत ‘वेध’ रुग्णालयात घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:59 PM2019-03-16T22:59:35+5:302019-03-16T23:03:57+5:30
येथील मुख्य बसस्थानकाजवळील वेध डायग्नोस्टिक सेंटर या हॉस्पिटलमध्ये आलास (ता. शिरोळ) येथे गर्भवती महिलेस गर्भलिंग निदान करण्यास आणणाऱ्या दोन एजंटांचा डॉ.
सांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील वेध डायग्नोस्टिक सेंटर या हॉस्पिटलमध्ये आलास (ता. शिरोळ) येथे गर्भवती महिलेस गर्भलिंग निदान करण्यास आणणाऱ्या दोन एजंटांचा डॉ. जयश्री पाटील व डॉ. श्रेणिक पाटील यांनी शनिवारी भांडाफोड केला.
महिलेसह दोन एजंटांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने पोलिसांची मदत घेऊन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाणार असल्याचे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी संजय कवठेकर यांनी सांगितले.
बानू शेख (रा. सांगली) व जब्बार सनदी (ब्रम्हनाळ, ता. पलूस) अशी ताब्यात घेतलेल्या एजंटांची नावे आहेत. हे दोघेही सिव्हिल चौकातील एका खासगी रुग्णालयात नोकरीस आहेत. त्यांनी आलास येथील गर्भवती महिलेस गर्भलिंग निदान करण्यासाठी गळ घातली. ही महिलाही तयार झाली. यासाठी त्यांनी महिलेकडून २० हजार रुपये घेतले. शनिवारी दुपारी बारा वाजता ते वेध डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नेले. संशयितांनी डॉ. श्रेणिक पाटील यांची भेट घेऊन महिलेची ‘तुम्हीच सोनोग्राफी तपासणी करा’, असा आग्रह धरला. त्यांना संशय आला. त्यांनी त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्याही तातडीने रुग्णालयात आल्या. त्यांनी संबंधित महिलेस विश्वासात घेऊन चौकशी केली. या महिलेने ‘मला बानू शेख व जब्बार सनदी यांनी गर्भलिंग निदान करण्यासाठी येथे आणले आहे, यासाठी त्यांनी २० हजार रुपये घेतले आहेत, असे सांगितले.
डॉ. जयश्री पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शहरचे पोलीस निरीक्षक मिलींद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे व महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर दाखल झाले. डॉ. कवठेकर यांनी गर्भलिंग निदानास आणलेल्या महिलेची चौकशी केली. तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर बानू शेख व जब्बार सनदी यांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
ओळखीतून हमी
संशयित शेख व सनदी सिव्हिल चौकातील ज्या रुग्णालयात नोकरी करतात, तिथे आलासमधील या महिलेचे नातेवाईक उपचारासाठी काही दिवसांपूर्वी दाखल होते. ही महिला त्यांना पाहण्यास गेली होती. त्यावेळी शेख व सनदी यांच्याशी ओळख झाली. यातून त्यांनी महिलेस गर्भलिंग निदान करुन देण्याची हमी दिली होती. यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली. महिलेचा साडी विक्रीचा व्यवसाय आहे. साड्या विकून तिने पैशाची जुळणी करुन संशयितांना दिले होते.
गर्भलिंग निदान व गर्भपात प्रतिबंधक कायद्यांतर्गत न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. संशयितांसह डॉ. जयश्री पाटील, डॉ. श्रेणिक पाटील यांचे जबाब घेतले जातील.
- डॉ. संजय कवठेकर, आरोग्य अधिकारी, महापालिका, सांगली.