सांगली जिल्ह्यात खरिपाचे अडीच लाख हेक्टर क्षेत्र, पेरणी केवळ ५५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर
By अशोक डोंबाळे | Published: July 22, 2023 06:15 PM2023-07-22T18:15:47+5:302023-07-22T18:16:23+5:30
उर्वरित ७८.१३ टक्के क्षेत्र पडूनच असल्यामुळे खरीप धोक्यात
सांगली : जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून यापैकी केवळ ५५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. २२ जुलैपर्यंत २१.८७ टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित ७८.१३ क्षेत्रावर ती झालीच नाही. पेरलेल्या क्षेत्रातील पीक वाळून गेल्यावर पाऊस असल्यामुळे तेथेही दुबार पेरणीचे संकट आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे १५ जूनपासून खरीप पेरण्यांना सुरुवात होऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १०० टक्के पेरण्या पूर्ण होत असत; पण यावर्षी जून महिन्यात काहीच पाऊस न झाल्यामुळे खरीप पेरण्या पूर्णत: ठप्प झाल्या. जुलै संपण्यास आठवडा राहिला असताना केवळ २१.८७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित ७८.१३ टक्के क्षेत्र पडूनच असल्यामुळे खरीप धोक्यात असल्याचे चित्र आहे.
कडधान्याची ४.१ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीचे २६ हजार ८७०३ हेक्टर क्षेत्र असून ३४५६.५ हेक्टरवर म्हणजे १२.८२ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीचे ५४ हजार २३०.४ हेक्टर क्षेत्र असून ३६०२.७ हेक्टरवर म्हणजे ६.६४ टक्के पेरणी झाली आहे. मक्याचीही केवळ १५.५९ टक्के पेरणी झाली आहे.
भाताची ८५.८३ टक्के लागण
खरीप हंगामात भात पिकाचे १४ हजार २७५.८ हेक्टर क्षेत्र असून १२ हजार २५२.६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती ८५.८३ टक्के आहे. शिराळा तालुक्यात पहिल्यांदाच भाताची शंभर टक्के लागण होऊ शकलेली नाही. यावरून खरीप हंगाम अडचणीत असल्याचे दिसते.