Sangli: पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:59 PM2023-09-27T15:59:06+5:302023-09-27T16:00:02+5:30
वीजनिर्मिती केंद्रामधील तांत्रिक बिघाडामुळे या केंद्रातून होणारा विसर्ग बंद
शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या वक्राकार दरवाजातून रात्री ८च्या दरम्यान १५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नदीपात्रात पाणी सोडल्याने काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीजनिर्मिती केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे त्यातील १४५५ क्युसेकचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. मंगळवारी तालुकाभरात पावसाने हजेरी लावली.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे २२ मिलिमीटर (एकूण ५४१३), निवळे १६ मिलिमीटर (एकूण ३८६३), धनगरवाडा २ मिलिमीटर (एकूण २०७३), चांदोली धरण परिसर एकूण १७१८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मंगळवारी निवळे येथे १४ मिलिमीटर, पाथरपुंज येथे ५ मिलिमीटर पाऊस झाला. वीजनिर्मिती केंद्रामधील तांत्रिक बिघाडामुळे या केंद्रातून होणारा १४५५ क्युसेक विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वक्राकार दरवाजे उघडून त्यातून १५०० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.