सांगलीत नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक, गोळ्यांचा साठा जप्त; एलसीबीची कारवाई
By शरद जाधव | Published: May 11, 2023 04:47 PM2023-05-11T16:47:52+5:302023-05-11T16:48:19+5:30
सांगलीसह मिरज शहरात नशेसाठी काही विशिष्ट गोळ्यांचा वापर होत असल्याचे समोर आले होते
सांगली : शहरात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगलीत कारवाई करत दोघांना जेरबंद केले. अनिकेत विजय कुकडे (वय २१, रा. गुजर बोळ, बुरूड गल्ली,सांगली) व उमर सलीम महात (२०, रा. गवळी गल्ली,सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या २५० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सांगलीसह मिरज शहरात नशेसाठी काही विशिष्ट गोळ्यांचा वापर होत असल्याचे समोर आले होते. गेल्या आठवड्यात पोलिसांनी काहीजणांवर कारवाई केली होती. मानसिक आजारावरील या गोळ्यांचा नशेसाठी वापर होत असल्याचे समोर येताच, जिल्हाधिकाऱ्यांनीही बैठक घेत कारवाईच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यानुसार एलसीबने कारवाईसाठी खास पथक तयार केले आहे.
हे पथक शहरात गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, शहरातील कर्नाळ रोडवरील बुरूड गल्ली परिसरातील शिवमुद्रा चौकात दोघे संशयित नशेच्या गोळ्या विक्रीसाठी थांबले आहेत. पथकाने छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी गोळ्यांव्दारे नशा करणाऱ्यांना चढ्या दराने गोळ्या विक्रीसाठी थांबल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या २५० गोळ्या जप्त करण्यात आल्या.
कुकडे याने या गोळ्या कुठून आणल्या याबाबत विचारणा केली त्यात त्याने शाहबाज शेख उर्फ जॅग्वार (रा. कर्नाळ रोड,सांगली) याच्याकडून उमर महात याने विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सुधीर गोरे, संदीप पाटील, सागर लवटे, राहूल जाधव, विक्रम खोत आदीच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.
कारवाई सुरूच राहणार
या गोळ्या घेतल्याने मेंदूवर गुंगीकारक परिणाम होतात असे औषध निरीक्षक विकास पाटील यांनी सांगितले. संशयित कुकडे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह अन्य गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नशेसाठी अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यावर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.