Sangli Crime: विट्यातून एमडी ड्रग्ज विकत घेणाऱ्या मुंबईतील दोघांना अटक, चारवेळा दिला गुंगारा
By घनशाम नवाथे | Updated: March 3, 2025 19:26 IST2025-03-03T19:25:45+5:302025-03-03T19:26:57+5:30
सांगली : विट्याजवळील कार्वे येथे टोळीने बनवलेले एमडी ड्रग्ज मुंबईतील दोघांनी विकत घेतल्याचे पोलिस तपासात अखेर स्पष्ट झाले. माल ...

Sangli Crime: विट्यातून एमडी ड्रग्ज विकत घेणाऱ्या मुंबईतील दोघांना अटक, चारवेळा दिला गुंगारा
सांगली : विट्याजवळील कार्वे येथे टोळीने बनवलेले एमडी ड्रग्ज मुंबईतील दोघांनी विकत घेतल्याचे पोलिस तपासात अखेर स्पष्ट झाले. माल विकत घेणाऱ्या मोहम्मद कय्युम अकबर अली शेख (वय ३६, रा. कुर्ला कमान, काजूपाडा, आझाद चाळ मुंबई), मोहम्मद इस्माईल सलीम खान (वय ४५, रा. कलिना डाेंगर, शेडी हाजी चाळ, नूरी मस्जिदसमाेर, सांताक्रुझ-पूर्व मुंबई) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झालेल्या टोळीने तेथे असताना एमडी ड्रग्जचे उत्पादन करण्याचे ठरवले होते. त्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर जागा शोधत होते. विट्यातील बलराज कातारी याने कार्वे येथील औद्योगिक वसाहतीतील माऊली इंडस्ट्रीज हा बंद कारखान्याचे शेड गोकुळा पाटील हिच्याकडून भाड्याने घेतले. संशयित रहुदीप बोरिचा, सुलेमान शेख, जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील यांनी तेथे एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उभारला. परफ्युमचे उत्पादन करणार असल्याचे सांगून ड्रग्जचे उत्पादन सुरू केले.
येथून तयार ड्रग्ज विक्रीसाठी बाहेर नेताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रहुदीप बोरिचा, सुलेमान शेख, बलराज कातारी या तिघांना दि. २७ जानेवारी रोजी अटक केली. २९ कोटी ७३ लाख रूपयाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. पुढे तपासात जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील आणि जागा भाड्याने देणारी गोकुळा पाटील यांना अटक केली.
अटक केलेले सात संशयित सध्या कारागृहात आहेत. पोलिस तपासात टोळीला दोनवेळा एमडी बनवण्यात अपयश आल्यानंतर तिसऱ्यांदा परिपूर्ण एमडी बनवल्याचे स्पष्ट झाले. या टोळीने पकडले जाण्यापूर्वी एमडी ड्रग्ज विक्री केले असल्याचा संशय होता. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू होता.
संशयित परमार व अब्दुलरज्जाक शेख यांच्या चौकशीत तयार ड्रग्ज मोहम्मद शेख व मोहम्मद खान यांना विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे दोघांना पकडण्यासाठी पोलिस पथक मागावर होते. दोघेजण वाकोला (मुंबई) हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे तपास करत आहेत.
निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी सागर टिंगरे, अनिल कोळेकर, नागेश खरात, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, दरीबा बंडगर, सागर लवटे, इम्रान मुल्ला, नागेश कांबळे, अमर नरळे, सतीश माने, महादेव नागणे, संदीप नलवडे, उदय माळी, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने कारवाई केली.
चारवेळा दिला गुंगारा
मोहम्मद शेख व मोहम्मद खान या दोघांची नावे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने चारवेळा मुंबईत धडक मारली. परंतू त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला. अखेर पोलिस तांत्रिक माहिती व खबऱ्याच्या मदतीने दोघांना अटक केली.
किती ड्रग्ज विक्री केले
टोळीने पकडले जाण्यापूर्वी ड्रग्ज विक्री केल्याचा पोलिसांचा संशय होता. तो अखेर खरा ठरला. किती रूपयांचे ड्रग्ज टोळीने विक्री केले होते, याचा पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.