ऑनलाईन मोबाईल मागवायचे, अन् डिलीव्हरी बॉयची फसवणूक करायचे; सांगलीत दोघे जेरबंद
By शरद जाधव | Published: April 12, 2023 06:51 PM2023-04-12T18:51:59+5:302023-04-12T18:53:17+5:30
आठ लाखांचा मुद्देमाल जप्त, बॉक्समधून मोबाईल काढून साबणाच्या वड्या ठेवत
सांगली : ऑनलाईन शॉपिंगव्दारे माेबाईल मागवून डिलीव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून मोबाईल काढून घेत फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. महंमद उर्फ जॉर्डन युसूफ इराणी (वय २९) व उम्मत युसूफ इराणी (२९, दोघेही रा. ख्वॉजा कॉलनी, सह्याद्रीनगर,सांगली) असे संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून १४ मोबाईलसह दुचाकी असा आठ लाख दोन हजार २१७ रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ऑनलाईन कंपनीला मोबाईलची ऑर्डर देवून ती देण्यासाठी येणाऱ्या डिलीव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून मोबाईल काढून घेत त्याऐवजी साबणाच्या वड्या देत फसवणूकीचे करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पाश्व'भूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी खास पथकाव्दारे या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, शहरातील भारत सुतगिरणी चौक येथे संशयित दोघे येणार आहेत. त्यानुसार छापा मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी गुन्ह्याची कबुली दिली.अशाप्रकारे १४ मोबाईल त्यांनी हातचलाखी करून काढून घेतल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास पवार, नागेश खरात, हेमंत ओमासे, कुबेर खोत, सागर लवटे, दीपक गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
बॉक्समधून मोबाईल काढून साबणाच्या वड्या ठेवत
ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना मोबाईलची ऑर्डर देवून मोबाईल घेऊन डिलीव्हरी बॉय आल्यानंतर त्यााला बोलण्यात गुंतवून त्यातील एकजण बाजूला जावून मोबाईल काढून घेत असे व त्याऐवजी साबणाच्या वड्या ठेवत असे. त्यानंतर पैसे नसल्याचे कारण देत अथवा इतर कारण सांगून तो बॉक्स परत दिला जात होता. यातून मिळालेल्या मोबाईलची ते विक्री करत हाेते.