इस्लामपुरातील दागिने चोरीप्रकरणी दोघींना सोलापुरात अटक, अडीच लाखांवर दागिने जप्त
By अशोक डोंबाळे | Published: March 25, 2024 06:34 PM2024-03-25T18:34:49+5:302024-03-25T18:35:32+5:30
इस्लामपूर, विटा येथील गुन्ह्यांची कबुली
इस्लामपूर : शहरातील सराफी बाजारातील कोठारी गोल्ड सिल्व्हर ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या सोलापूर शहरातील मुमताज नजीर शेख (६२) आणि नाजीया वसीम शेख (३३, दोघी रा. नयी जिंदगी, अमन चौक, सोलापूर) या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी त्यांच्याकडील दोन लाख ५८ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांनी यावेळी या दोघींनी विटा पोलिस ठाणे हद्दीत केलेल्या चोरीचा छडाही लावला. या दोघींची अधिक तपासासाठी विटा पोलिसांकडे रवानगी केली आहे.
२२ मार्चच्या दुपारी या दोघींनी गांधी चौकातील प्रतापचंद हुकमीचंद कोठारी यांच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने तेथील काउंटरवरील दागिने दाखवत असताना या हातचलाखीने १५ आणि २० ग्रॅम वजनाची सोन्याची प्रत्येकी एक बांगडी आणि साडेसात ग्रॅम वजनाचे मिनी गंठण चोरून पोबारा केला होता. ही बाब लक्षात येताच कोठारी यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.
त्यावर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सोलापूर येथे जाऊन या दोघींना ताब्यात घेतले. त्यांनी इस्लामपूर आणि विटा येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
या कारवाईत सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, उपनिरीक्षक सागर गायकवाड, हवालदार दीपक ठोंबरे, आलमगीर लतीफ, सतीश खोत, वर्षा मिरजकर, पूनम खोत व सायबरचे कॅप्टन गुंडेवार यांनी भाग घेतला. सागर गायकवाड अधिक तपास करत आहेत.