sangli crime news: पत्नीला नांदायला पाठवत नाही म्हणून सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:46 AM2023-01-18T11:46:51+5:302023-01-18T11:47:16+5:30
न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथील आप्पासाहेब आण्णाप्पा मल्लाड यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी सचिन रुद्राप्पा बळोळी (वय ३६ ) शिवानंद मल्लकाप्पा जनवाड (१९, दोघे रा ऐगळी,ता अथणी) याला पोलिसांनी तिकोटा (जि.विजापूर) येथे पकडले. न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पूर्व भागातील दरीबडची डाळिंब बागायतदार आप्पासाहेब मल्लाड यांचा मुलगी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने शुक्रवारी रात्री खून केला होता. मयत आप्पासो मलाड यांची मुलगी तेजश्री हिचा विवाह सचिन बळळ्ळो याच्याशी २०१९ मध्ये झाला होता. लग्नानंतर महिनाभरातच पती-पत्नी, सासूमध्ये वाद होऊ लागला. वादामुळे तेजश्री ही माहेरी राहण्यासाठी आली होती. जावई सचिन यांनी पत्नीला नांदवण्यास पाठविण्यासाठी अथणी (जि.बेळगाव) न्यायालयातून नोटीस पाठविले होते. जत दिवाणी न्यायालयात तेजश्री हिने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता.
गेल्या महिनाभरापासून फोनवरुन जावई बघून घेण्याची, जीवे मारण्याची धमकी देत होता. शुक्रवारी रात्री सिचन रुद्राप्पा बळोळी, भाऊ मिलन रुद्राप्पा बळोळी, शिवानंद मल्लकाप्पा जनवाड यांनी पाळत ठेवून सासरे आप्पासाहेब यांचा खून केला. पोलिसांनी तातडीने शनिवारी मध्यरात्री ऐगळी येथे धाड टाकून मिलन बळोळी याला अटक केली.मिलन बळोळी याला १८ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
मुख्य आरोपी सचिन बळोळी पोलिसांना पाहून पळून गेला. त्यांचा शोध पोलिस पथकाकडून घेतला जात होता. पोलिसांना तिकोटा (जि विजापूर) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून सचिन बळोळी व शिवानंद जानवाड या दोघांना अटक केली. त्यांना जत न्यायालयात हजर केले असता २० जानेवारी पर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड करीत आहेत.