उद्योजक होसमणींच्या खूनप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: February 4, 2016 01:14 AM2016-02-04T01:14:26+5:302016-02-04T01:16:25+5:30
गूढ उकलले : आर्थिक वादातून खून केल्याची गुन्हेगारांची कबुली
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील उद्योजक भास्कर होसमणी यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी यश आले. या खूनप्रकरणी संतोष दामाजी धनवडे (वय ३४, रा. वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगली) व प्रमोद ईश्वर करजगार (२७, रा नवजीवन कॉलनी, अहिल्यानगर, सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार व ‘नाजूक’ कारणावरून खून केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यात होसमणी यांचा सांगली-कोल्हापूर रस्त्याकडे जाणाऱ्या धामणी रस्त्यावरील म्हसोबा मंदिरासमोर बॅट व दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. होसमणी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून निघाले होते. त्यानंतर ते संपत चौकातील एका हॉटेलमागे गेले होते. तेथून ते एका व्यक्तीसोबत गेल्याचे अनेकांनी पाहिले होते; पण ती व्यक्ती कोण याचा उलगडा होत नव्हता. माधवनगर रस्त्यावरील मीरा हौसिंग सोसायटीसमोर असलेल्या एका वाहन शोरूमजवळ रस्त्याकडेला असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले होते.
अत्यंत गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक बनलेल्या या खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान सांगली ग्रामीण पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. घनवट यांनी खुनाच्या तपासासाठी स्वतंत्र पथके तयार केली. अखेर या खुनाचा गुंता सोडविण्यात घनवट व त्यांच्या पथकाला यश आले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संतोष धनवडे व प्रमोद करजगार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी खुनाची कबुली दिली.
होसमणी यांच्या कारखान्याशेजारीच धनवडे हा कँटीन चालवता होता. त्याच्या कँटीनमध्ये प्रमोद करजगार कामाला होता. धनवडे याने होसमणी यांच्याकडून पन्नास हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी होसमणी यांनी तगादा लावला होता. पैशापोटी त्यांनी धनवडेची मोटारसायकलही आणली होती. मात्र धनवडे याने त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल परत नेली होती. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. पैसे परत करता येत नसतील तर बायकोला माझ्याकडे पाठव, अशा भाषेत होसमणी यांनी धनवडेला सुनावले होते. त्याचा राग मनात धरून धनवडे याने त्यांना धामणी रस्त्यावर नेऊन प्रमोदच्या साथीने खून केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या दोन्ही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या कारवाईत निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, कर्मचारी दीपक पाटील, शंकर पाटील, नारायण निकम, विनोद चव्हाण, कुलदीप कांबळे, संदीप मोरे, विजयकुमार पुजारी, किशोर काबुगडे, सीमा धनवडे, योगीता लोखंडे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)