जबरी चोरीतील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:18 AM2021-06-23T04:18:44+5:302021-06-23T04:18:44+5:30
सांगली : चाकू दाखवून मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. साहेबराव बिरमल खैरावकर (वय १९, रा. प्रगती कॉलनी, ...
सांगली : चाकू दाखवून मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. साहेबराव बिरमल खैरावकर (वय १९, रा. प्रगती कॉलनी, शंभर फुटी रस्ता, सांगली), संतोष तायाप्पा मिरजे (२१, रा. हनुमाननगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सौरभ आप्पासाहेब डुबुले (२४, रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ) याने फिर्याद दिली आहे.
डुबुले हा देशिंग येथील आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास डुबुले विश्रामबाग परिसरात पुस्तके खरेदीसाठी आला होता. त्याला दुकान सापडत नसल्याने तो मोबाईलवर सर्च करीत असताना दुचाकी (एमएच १० एएस ३०८७) वरून दोघे संशयित आले. त्यांनी चाकू दाखवून हिसडा मारून डुबुलेचा मोबाईल जबरीने लांबवला आणि ते भरधाव निघून गेले.
याबाबत डुबुले याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित साहेबराव खैरावकर आणि संतोष मिरजे या दोघांना अटक केली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, अमितकुमार पाटील, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, अंमलदार आदिनाथ माने, विलास मुंढे, संदीप घस्ते, ऋतुराज होळकर, महंमद मुलाणी, तेजस कुंभार, सुदर्शन पाटील यांचा कारवाईत सहभाग होता.