इस्लामपुरात वीज कर्मचाऱ्याला दोघांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:27 AM2021-03-17T04:27:51+5:302021-03-17T04:27:51+5:30
इस्लामपूर : घरगुती वापराच्या थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ...
इस्लामपूर : घरगुती वापराच्या थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खांबे गल्ली येथे घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणण्यासह मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहायक लाइनमन महेश सर्जेराव पाटील (इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास पांडुरंग कोळी आणि अतुल कोळी (दोन्ही रा. खांबे गल्ली, इस्लामपूर) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
महेश पाटील हे घरगुती वापराचे थकीत वीज बिल भरा, नाही तर वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असे सांगत होते. त्यावेळी दोघांनी पाटील यांना ‘आमचे कनेक्शन कसे तोडता, खांबावर चढला तर आम्ही दगडाने तुम्हाला पाडू’, अशी धमकी दिली. महेश पाटील हे खांबावर चढले असता विलास कोळी यांनी त्यांचा पाय ओढला. त्यावेळी पाटील खांबावरून खाली खेचले गेले. त्यामध्ये त्यांच्या बोटांना जखमा झाल्या. अतुल कोळी यांनी मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा आणला.