Sangli: पाडळीवाडी ओढ्याच्या पुरात दोघे दुचाकीस्वार वाहून गेले, प्रसंगावधानामुळे बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:03 PM2024-08-19T18:03:20+5:302024-08-19T18:04:03+5:30
शिरसी : शिराळा तालुक्यातील निगडी-पाडळीवाडीदरम्याच्या ओढ्यास शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दाेघे दुचाकीस्वार वाहून गेले. केवळ प्रसंगावधान राखून ...
शिरसी : शिराळा तालुक्यातील निगडी-पाडळीवाडीदरम्याच्या ओढ्यास शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दाेघे दुचाकीस्वार वाहून गेले. केवळ प्रसंगावधान राखून झाडास पकडून राहिल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे दाेघेही बचावले. शनिवारी रात्री ही घटना घडली.
तालुक्याच्या उत्तर भागात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता दमदार पाऊस झाला. निगडी-पाडळीवाडीदरम्यान असलेल्या ओढ्याला अचानक पाणी वाढले. दरम्यान, पाडळीवाडीचे बाबासाहेब काशीनाथ पाटील (वय ४५) व मारुती दादू पाटील (वय ४६) कामानिमित्त निगडी येथे आले होते. पावसाचा जोर वाढल्याने, त्यांना गावातच थांबावे लागले. रात्री दहा वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने दोघे दुचाकीवरून पाडळीवाडीस परतत हाेते. यावेळी ओढ्याचे पाणी पुलावरून जात होते. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दाेघेही क्षणात दुचाकीसह ओढ्यात वाहून गेले.
बाबासाहेब पाटील यांना पोहता येत होते. तीनशे फूट वाहत गेल्यावर झाडाच्या फांदीचा आधार घेत ते कसेबसे पाण्याबाहेर पडले. शेतातून वाट शोधत ते ओढ्यापासून शंभर फुटावर सुनंदा साळुंखे यांच्या घरात आले. साळुंखे कुटुंबास आपला मित्र पाण्यात वाहून गेल्याचे सांगून गावातील लाेकांना मदतीसाठी बाेलावण्यास सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सुनंदा साळुंखे, त्यांचा मुलगा अनिकेत यांनी गावातील लोकांसह व पशुवैद्यक डॉ. दीपक पाटील यांना घटनेची माहिती दिली.
अंधारात बॅटरीच्या उजेड पाडत मारुती पाटील यांचा शोध सुरू केला. घटनास्थळापासून पाचशे फूट अंतरावर ते झाडाला पकडून थांबल्याचे दिसून आले. तरुणांनी पाण्यात उतरून त्यांना बाहेर काढले. रविवारी सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकीही सापडली.
साळुंखे कुटुंबाचे प्रसंगावधान
शनिवारी रात्री पुलावरून पाणी जात हाेतेे. पाण्याचा मोठा प्रवाह आहे, हे लक्षात आल्यानंतर जवळच राहत असलेल्या साळुंखे कुटुंबीयांनी रस्त्यावर बैलगाडी आडवी लावली. मोठा पाऊस असतानाही सुनंदा साळुंखे यांनी घरासमोर उभे राहून, दूध गाड्यांसह अनेक चारचाकी व दुचाकी वाहने परत पाठवली. त्यामुळे माेठी दुर्घटना टळली.