Sangli: दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक, कुपवाडमध्ये दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:03 PM2024-01-05T12:03:14+5:302024-01-05T12:03:27+5:30

डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघांचा जागीच मृत्यू

Two bikes collide head on, two killed in Kupwad sangli | Sangli: दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक, कुपवाडमध्ये दोघे जागीच ठार

Sangli: दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक, कुपवाडमध्ये दोघे जागीच ठार

कुपवाड : शहरातील माधवनगर ते मिरज रस्त्यावरील चाणक्य चौकालगत असलेल्या एका शाळेसमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही दुचाकी चालक जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता झाला. पंकज सुभाष लोहार (वय २२, रा. सुतार गल्ली, शामनगर, कुपवाड) व किरण हणमंत कोळी (वय १७, रा. मंगलमूर्ती काॅलनी, गल्ली नंबर १, कुपवाड) अशी मृतांची नावे आहेत.

अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री किरण कोळी हा दुचाकीवरून (एमएच १० बीडब्ल्यू ४९०७) चाणक्य चौकातून मिरजेकडे जात होता. तर पंकज लोहार हा दुचाकी (एमएच १० डीएस ९७६६) वरून मिरजेहून घरी जात होता. चाणक्य चौकाजवळील एका शाळेसमोरील रस्त्यावर या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोघेजण डांबरी रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाले. त्यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन किरण कोळी व पंकज लोहार या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शहरातील आयुष हेल्पलाईन टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी व संजयनगर या दोन्ही पोलिस ठाण्यातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातातील दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या.

दोघांच्या मृत्यूबद्दल हळहळ

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत पंकज लोहार हा सुतारकाम करीत होता. तर किरण कोळी हा एका हाॅटेलमध्ये कामाला होता. दोघा युवकांचा मृत्यू झाल्याने शहरातील श्यामनगर आणि मंगलमूर्ती काॅलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Two bikes collide head on, two killed in Kupwad sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.