ढवळेश्वर येथे दोन धाडसी चोऱ्या, विटा पोलीस ठाण्यात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 07:52 PM2019-05-29T19:52:55+5:302019-05-29T19:54:23+5:30
बंद घराचे कुलूप तोडून ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रोख २ लाख ६५ हजार रूपयांसह साडेचार लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास ढवळेश्वर येथे घडली. याप्रकरणी रात्री उशिरा विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विटा : बंद घराचे कुलूप तोडून ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रोख २ लाख ६५ हजार रूपयांसह साडेचार लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास ढवळेश्वर येथे घडली. याप्रकरणी रात्री उशिरा विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, ढवळेश्वर येथील शहाजी गंगाराम किर्दत या ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील रोख १ लाख ५० हजार रुपयांसह अंदाजे ३ लाख १० हजार रूपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असताना, त्यांच्या तक्रारीऐवजी १ लाख १५ हजाराची रोकड लंपास झालेल्या विकास जाधव यांची पोलिसांनी फिर्याद घेतल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ढवळेश्वर येथे विकास विजय जाधव हे उन्हाळा असल्याने घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते. सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी लोखंडी कपाटातील १ लाख १५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या शहाजी किर्दत यांच्या घराकडे मोर्चा वळविला. किर्दत हे मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. सुटी असल्याने ते गावी ढवळेश्वरला आले होते. परंतु, सोमवारी ते नातेवाईकांकडे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्याही घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील रोख १ लाख ५० हजार रुपयांसह १ लाख ६० हजार रूपये किमतीचे ६५ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख १० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
ढवळेश्वर येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, चोरट्यांनी येथील शहाजी किर्दत यांच्या घरातील ३ लाख १० हजार रूपयांचा सर्वाधिक ऐवज लंपास केला असतानाही, पोलिसांनी १ लाख १५ हजार रूपयांची चोरी झालेल्या विकास जाधव यांची मूळ फिर्याद घेतल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.