भरधाव माेटारीच्या धडकेत दाेघे वीटभट्टी कामगार ठार, मिरज-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:04 PM2023-02-06T16:04:02+5:302023-02-06T16:04:33+5:30
वर्मी मार लागल्याने दाेघेही जागीच ठार
मिरज : राष्ट्रीय महामार्गावर मिरज-कोल्हापूर रस्त्यावर धामणी (ता. मिरज) येथे भरधाव मोटारीने ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे वीटभट्टी कामगार जागीच ठार झाले. अपघातानंतर माेटारचालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. सिद्धार्थ परसू कांबळे (वय २५), सदाशिव बाबू कांबळे (वय १६, रा. गुगवाड, ता. जत, सध्या रा. संगपाळ वीटभट्टी, शिरोळ) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात रविवारी (दि. ५) घडला.
सिद्धार्थ व सदाशिव कांबळे हे दाेघेही शिरोळ येथे वीटभट्टीवर कामगार होते. धामणी येथे सिद्धार्थ याच्या बहिणीकडे दोघे दुचाकीवरून गेले होते. परत येताना धामणीकडून मिरजेच्या दिशेने चुकीच्या बाजूने दोघे येत असताना मिरजेकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या माेटारीने (क्र. एमएच ०९ डीएम ५४९५) त्यांना मिरजेजवळ पाटील पेट्रोल पंपासमोर त्यांना ठोकरले.
दुचाकीला समोरून धडक बसून दाेघेही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. वर्मी मार लागल्याने दाेघेही जागीच ठार झाले. घटनास्थळी रक्ताचे थारोळे पसरले होते. अपघातात दुचाकीचा चक्काचूर होऊन मोटारीचेही नुकसान झाले. अपघातानंतर मोटार चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.