आळसंद येथे दोघा सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:49+5:302021-05-29T04:21:49+5:30
आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद गावात १० दिवसांत दोघा सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नरुले कुटुंबातील या दोघा भावंडांच्या ...
आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद गावात १० दिवसांत दोघा सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नरुले कुटुंबातील या दोघा भावंडांच्या मृत्यूने त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने आळसंदसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. विद्याधर कृष्णाजी नरुले (वय ५०) व सुधाकर कृष्णाजी नरुले (वय ४८) अशी या सख्ख्या भावांची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी आळसंद गावातील नरुले कुटुंबातील वयोवृद्ध आई, दोन मुले व त्यांच्या नातीस कोरोनाची लागण झाली होती. आई व मुलगी घरी उपचार घेऊन कोरोनामुक्त झाल्या; परंतु विद्याधर व सुधाकर यांना विटा येथून इस्लामपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान दि. १९ मे रोजी विद्याधर यांचा मृत्यू झाला होता.
एका मुलाच्या मृत्यूचे दुःख उराशी बाळगत दुसऱ्या मुलाला वाचविण्यासाठी थोरला भाऊ रत्नकुमार व मुलांची धडपड सुरू होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब धीर एकवटून आलेल्या प्रसंगाला तोंड देत सुधाकर यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर दि. २७ मे रोजी काळाने नरुले कुटुंबीयांवर झडप घालून सुधाकर नरुले यांना हिरावून घेतले. या बातमीने संपूर्ण गाव हबकून गेले. दोन कर्तीधर्ती मुले गेल्यामुळे कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. कुटुंबात रत्नकुमार, विद्याधर व सुधाकर अशी तीन भावंडे आहेत. यामध्ये मोठे बंधू रत्नकुमार हे शिक्षक आहेत. विद्याधर हे शेती करत होते.
सुधाकर नरुले हे प्रशासकीय सेवेत होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागात उपचिटणीस पदावर काम केले होते. त्यानंतर नायब तहसीलदारपदी कार्यरत होण्यापूर्वी मार्च २०२० रोजी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. तासगाव तहसील कार्यालयात गोदाम व्यवस्थापक, कडेगांव, विटा, जत, कवठेमहांकाळ या ठिकाणी अव्वल कारकून या पदावर अत्यंत प्रामाणिकपणे काम केले होते. त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर प्रशासकीय सेवेत आपला वेगळा ठसा उमटविला होता. स्वेच्छा निवृत्तीनंतर नरुले यांनी कोरोना योद्धा म्हणून ग्राम समितीसोबत काम केले होते. त्यामुळे आळसंद गावातून कोरोना योद्धा गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.