सांगलीतील धुळकरवाडीत वीज पडून दोन म्हैशी ठार; मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 06:14 PM2023-05-11T18:14:04+5:302023-05-11T18:20:21+5:30
दरीबडची : जत तालुक्यातील धुळकरवाडी परीसरात आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली होती. रात्रीच्या सुमारास ...
दरीबडची : जत तालुक्यातील धुळकरवाडी परीसरात आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली होती. रात्रीच्या सुमारास जोरदार विजेच्या कडकडाट झाला. दरम्यान, वीज पडून दोन म्हैशी ठार झाल्या. यादुर्घटनेत ईश्वर आप्पाराया करे यांचे अंदाजे ८० हजार रुपयाचे नुकसान झाले.
पूर्व भागातील धुळकरवाडी येथील ईश्वर करे हे कुंटुंबासह कर्नाटकातील हुबनूर गावाच्या सीमेलगतच्या शेतात राहतात. त्यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. त्यांनी घरासमोर बाभूळीच्या झाडाला दोन म्हैशी बांधल्या होत्या. आज, सकाळच्या सुमारास अचानक विजाच्या कडकडाटासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी वीज पडून करे यांच्या दोन म्हैशी ठार झाल्या. सुदैवाने दुसऱ्या झाडाला बांधलेल्या दोन म्हैशी बचावल्या. मात्र या दुर्घटनेत करे यांचे मोठे नुकसान झाले.
धुळकरवाडी वीज पडून जनावरे दगावल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी सुखदेव सोमा शिंदे यांच्या दोन जर्सी गाई २९ एप्रिलला वीज पडून ठार झाल्या होत्या. आठवडाभरानंतर ही दुसरी घटना घडली आहे.
या घटनेनंतर तलाठी, कोतवाल, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी अहवाल संख येथील अप्पर तहसिलदार कार्यालयाकडे पाठविला आहे.