टेम्पोची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक, अपघातानंतर टेम्पोला आग; सांगली जिल्ह्यातील दोघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:01 IST2025-02-10T14:00:28+5:302025-02-10T14:01:04+5:30
मंडप सजावटीचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकवर काळाचा घाला

टेम्पोची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक, अपघातानंतर टेम्पोला आग; सांगली जिल्ह्यातील दोघे ठार
कवठेमहांकाळ : धुळे येथे मंडप सजावटीचे साहित्य स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी जात असताना सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील मंडप व्यवसायिकांवर रविवारी पहाटे गल्ले बोरगाव (ता. खुलताबाद, जि. संभाजीनगर) गावच्या हद्दीत काळाने घाला घातला. पहाटेच्या सुमारास त्यांच्या टेम्पोने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. यानंतर टेम्पोने पेट घेतला. या गंभीर अपघातामध्ये दोन मंडप व्यवसायिक जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला.
विनायक जालिंदर पाटील (वय ४७ रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) आणि दादासाहेब बाजीराव देशमुख (वय ३५, रा. अंजनी ता. तासगाव, जि. सांगली) अशी मयत व्यवसायिकांची नावे आहेत. तर सलीम अब्दूल मुलाणी (वय ४३, रा. मळणगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) हा मंडप व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर संभाजीनर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये येथे उपचार सुरु आहेत. या अपघाताची खुलताबाद पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, धुळे येथे मंडप सजावटीचे साहित्य स्वस्त दरात घेण्यासाठी मंडप व्यावसायिक विनायक पाटील, दादासाहेब देशमुख, सलीम मुलाणी हे तिघे शनिवारी सायंकाळी मोटार (क्र. एम. एच ०४ एच डी - ३०४९) मधून धुळेकडे निघाले होते. विनायक पाटील गाडी चालक होते आणि सलीम मुल्ला बाजूला बसलेले होते. तर दादासाहेब देशमुख हे मोटारीच्या पाठीमागील बाजूस झोपी गेलेले होते. रविवारी पहाटे धुळे - सोलापूर मार्गावरील खुलताबाद तालुक्यात गल्ले बोरगाव गावाच्या हद्दीत छोटा हत्तीने रस्त्यालगत उभा असलेल्या ट्राॅलीस पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की गाडीमध्ये समोरील बाजूला बसलेले दोघे वाहनात अडकले. यावेळी सलीम अब्दूल मुलाणी यांनी बचतीसाठी आरडाओरड सुरु केली. अपघातीची माहिती मिळताच महामार्ग पोलिसानी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. सुरुवातीला सलीम मुलाणी याला बाहर काढण्यात आले. चालकास बाहेर काढता येत नव्हते. त्यासाठी मळीची ट्राॅली हलविण्यात आली. नेमक्या याच वेळी छोटा हत्ती गाडीने पेट घेतला.
पोलिसांनी पाठीमागील बाजूच्या हौद्यामध्ये असलेल्या दादासो देशमुख आणि सलीम यांना रुग्णवाहिकेमधून तातडीने संभाजीनगरकडे पाठविण्यात आले. छोटा हत्तीने पेट घेतल्याने चालक विनायक पाटील यांना बाहेर काढण्यात पोलिसांना अपयश आले. कांही क्षणातच आग विझविण्यात यश आले तोपर्यंत विनायक पाटील यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दोन गंभीर जखमींना आणणेत आलेनंतर डॉक्टरांनी दादासो देशमुख यास मृत घोषित करण्यात आले. सलीम मुलाणी यांचेवर उपचार सुरू आहेत.