‘वसंतदादा’ची दोन कोटींची साखर जप्त
By admin | Published: July 19, 2014 11:43 PM2014-07-19T23:43:04+5:302014-07-19T23:50:38+5:30
गोदाम सील : ‘उत्पादन शुल्क’ची कारवाई
मिरज : केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची सुमारे दोन कोटी रुपये किमतीची १३ हजार साखर पोती आज, शनिवारी जप्त केली. १ कोटी ५४ लाख रुपये उत्पादन शुल्क वसुलीसाठी कारखान्यातील गोदामाला सील ठोकण्यात आले.
वसंतदादा कारखान्याने एप्रिल व जून महिन्यांत विक्री झालेल्या साखरेचे १ कोटी ५४ लाख रुपये उत्पादन शुल्क भरलेले नाही. उत्पादन शुल्क वसुलीसाठी कारखाना व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नसल्याने
केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सहायक आयुक्त शुभेंद्र यांनी साखरेची पोती जप्त करण्याचे आदेश दिले. अधीक्षक ए. बी. पाटील, निरीक्षक एम. बी. कुलकर्णी यांच्या पथकाने आज दुपारी कारखान्याच्या गोदामातील १३ हजार ३९० पोती जप्त केली. साखर ठेवलेल्या १५ क्रमांकाच्या गोदामाला उत्पादन शुल्कचे सील ठोकण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या साखरेची किंमत १ कोटी ८७ लाख रुपये आहे.
जप्तीच्या कारवाईमुळे साखर परत मिळविण्यासाठी कारखान्याला १ कोटी ५४ लाख रुपये उत्पादन शुल्क, दंड व या रकमेवर १८ टक्के व्याज भरावे लागणार आहे. साखर कारखान्यात उत्पादित झालेल्या साखरेच्या विक्रीवर कारखाना व्यवस्थापनाने मे महिन्यातील साखर विक्रीचे उत्पादन शुल्क जमा केले; मात्र एप्रिल व जून महिन्यांतील मोठ्या प्रमाणात झालेल्या साखर विक्रीचे शुल्क भरले नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)