तलावात कृषीपंप सोडताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, सांगलीतील आटपाडीत घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 02:15 PM2023-07-21T14:15:42+5:302023-07-21T14:17:19+5:30
जेवणानंतर अनिकेतसोबत फिरायला म्हणून शेताकडे गेले आणि दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला
आटपाडी : येथील तलावातून पाणी उपशासाठी कृषीपंप सोडण्यासाठी गेलेल्या दोघा शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २०) दुपारी तीन वाजता ही घटना घडली. अनिकेत अमृत विभूते (वय २७, रा. माडगुळे, ता. आटपाडी) आणि त्याच्या मावशीचे पती विलास मारुती गुळदगड (४७, रा. शेवते, ता. पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.
आटपाडी शहराच्या पश्चिमेकडील तलावामध्ये हा प्रकार घडला. विभूतेची माडगुळे येथे शेती आहे. त्यासाठी आटपाडी तलावातून १२ किलोमीटरची पाइपलाइन करून पाणी नेले आहे. तराफ्याद्वारे विद्युतपंप पाण्यात सोडला आहे. गुरुवारी दुपारी अनिकेत व त्याच्या मावशीचे पती विलास दोघेही तलावाकडे गेले होते. तलावातील पाणीपातळी खालावल्याने पंप बाहेर आल्याचे दिसले. तो आणखी खाली सोडण्यासाठी दोघेही पाण्यात उतरले. यावेळी वायर शॉर्ट होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. त्यामुळे दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तलावाजवळच्या काही लोकांनी ही घटना पाहिली.
काही अंतरावर असलेल्या तडवळेचे सरपंच जितेंद्र गिड्डे, दादासाहेब मरगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वीजप्रवाह बंद करून दोघांनाही तलावातून बाहेर काढले. आटपाडी ग्रामीण रुग्णालयात नेले, पण उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच माडगुळे येथील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
सकाळीच माडगुळेला आले अन्...
अनिकेत विभूते अविवाहित होता. विलास गुळदगड गुरुवारीच शेवते येथून माडगुळेला आले होते. दुपारी जेवणानंतर अनिकेतसोबत फिरायला म्हणून शेताकडे गेले आणि दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला. दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.