बेदाणा असोसिएशनच्या दोन संचालकांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:29 AM2021-05-06T04:29:26+5:302021-05-06T04:29:26+5:30
सांगली : सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी संघटनेचे संचालक मनोज मालू व विनायक हिंगमिरे यांनी राजीनामा देत असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर ...
सांगली : सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी संघटनेचे संचालक मनोज मालू व विनायक हिंगमिरे यांनी राजीनामा देत असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. त्यामुळे संघटनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
संघटनेचे नवीन संचालक मंडळ निवडून आल्यापासून अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय अंमलात आणले जात नाहीत. पेमेंट वेळेवर दिले जात नाही. सोशल मीडियावर वैयक्तिक टीका केली जाते. कोरोनाकाळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सौदे बंद असतानाही नियम धाब्यावर बसवून काहीजण खासगी सौदे काढतात आदी कारणांमुळे वाद धुमसत होता. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार, उपाध्यक्ष संजय बोथरा आणि संचालक मंडळाची मंगळवारी बैठक झाली. बैठकीत कोरोनाकाळात ऑनलाइन पेमेंट करावे, स्टोअरेजधारकांनी बेदाणा उतरून घ्यावा, सॅम्पल कोणीही देऊ नये.
शासनाचा आदेश येईपर्यंत बेदाणा सौदा व खासगी व्यापार कोणीही करू नये तसेच संघटनेच्या ग्रुपवर वैयक्तिक संदेश टाकू नये असे ठरले. त्याप्रमाणे सभासदांना सोशल मीडियावर कळविले. परंतु त्यानंतरही सोशल मीडियावर वादग्रस्त संदेश टाकल्यामुळे संचालक मालू व हिंगमिरे यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. या दोघांचा राजीनामा संघटनेचे सचिव राजू माळी यांच्याकडे प्राप्त झाला आहे. दरम्यान, आणखी एका संचालकांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.