जिल्हा बँकेचे दोन निरीक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:41+5:302021-06-24T04:19:41+5:30
सांगली : हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील अग्रणी विकास सोसायटीमध्ये ७६ लाखांचा घोटाळा केल्याप्रकरणी लिपिक राजगोंडा पाटीलवर गुरुवारी गुन्हा दाखल ...
सांगली : हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील अग्रणी विकास सोसायटीमध्ये ७६ लाखांचा घोटाळा केल्याप्रकरणी लिपिक राजगोंडा पाटीलवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान याप्रकरणी कर्जप्रकरणात शहानिशा करताना हलगर्जीपणा केल्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांनी ही कारवाई केली. हिंगणगाव येथील अग्रणी विकास सोसायटीमधील लिपिकाने ७६ लाखाचा घोटाळा केल्याने खळबळ उडाली आहे. सोसायटीमध्ये येणाऱ्या सर्व प्रस्तावांची कामे या लिपिकाकडून पुढे जात होती. निश्चित केलेली प्रकरणे तो लिपिक जिल्हा बँकेकडे वर्ग करत होता. जिल्हा बँकेकडून विकास सोसायट्यांना कर्जपुरवठा केला जातो. मात्र सोसायटीकडून पाठवलेल्या कर्ज प्रकरणानंतर जिल्हा बँक थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जाची रक्कम जमा करीत असते. या लिपिकाने घरातील अनेक व्यक्तींच्या नावे बोगस कर्जे काढली. या कर्जाची रक्कम सातत्याने थकीत गेली असल्याने बँक व सोसायटीच्या सचिवाने कर्जदारांची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी हा प्रकार उजेडात आला.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने याप्रकरणी कर्जदाराची शहानिशा करताना हलगर्जीपणा करणाऱ्या बँकेचे निरीक्षक शहाजी पाटील व महावीर चव्हाण यांना निलंबित केले आहे.
चौकट
घोटाळ्यातील ४८ लाख वसूल
जयवंत कडू-पाटील यांनी सांगितले की, फसवणुकीतील ४८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित ३५ लाख रुपये सुद्धा वसूल करण्यात येतील. याशिवाय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.