बनावट नोटा खपविण्याचा सांगलीत टोळीकडून प्रयत्न एकास अटक : दोन हजाराच्या दोन नोटा जप्त; साथीदारांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 10:12 PM2018-08-24T22:12:28+5:302018-08-24T22:16:12+5:30
कल्याण (ईस्ट) येथील चौघांच्या टोळीने सांगलीत मुख्य बसस्थानकाजवळ दोन हजाराचा बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न केला. नागरिक व शहर पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला.
सांगली : कल्याण (ईस्ट) येथील चौघांच्या टोळीने सांगलीत मुख्य बसस्थानकाजवळ दोन हजाराचा बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न केला. नागरिक व शहर पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. टोळीतील एकास अटक करण्यात यश आले आहे, तर तिघांनी पलायन केले. त्याच्याकडून दोन हजाराच्या दोन बनावट नोटा जप्त केल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
राज राजकुमार उज्जेनलाल सिंह (वय २८, रा. शिवपूरम अपार्टमेंट, रुम १०५, विठ्ठल मंदिरजवळ, कल्याण) (ईस्ट) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे, तर प्रेम विष्णू राफा (३२), नरेंद्र प्रताप सिंग (३०) व मनीष (पूर्ण नाव निष्पन्न नाही) अशी पळून गेलेल्या तिघांची नावे आहेत.
बसस्थानकाजवळील मॉडर्न बेकरीजवळ हे चौघे उभे होते. एका चिरमुरे दुकानातून त्यांनी खाद्यपदार्थ खरेदी केले. यासाठी त्यांनी दोन हजाराची नोट दिली. दुकानात महिला होती. तिला या नोटेविषयी शंका आली. तिने संशयितांना ‘नोट बनावट आहे की काय?’ असा प्रश्न उपस्थित केला. यावर त्यांनी ‘नाही मावशी, नोट खरी आहे’, सांगितले. त्यानंतर ते तेथून एका चौकात जाऊन थांबले. महिलेने हा प्रकार ओळखीच्या व्यक्तीस सांगितला. या व्यक्तीने नोट पाहिली. त्यालाही ती बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तातडीने दाखल झाले. संबंधित महिलेने संशयित कुठे उभे आहेत, हे दाखविले. पोलीस त्यांना पकडण्यास गेले, पण पोलीस आल्याची चाहूल लागताच चौघांनी पलायन केले. यातील राज सिंह यास पकडण्यास यश आले, पण त्याचे साथीदार पळून गेले. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे तपास करीत आहेत.
संशयितास कोठडी
अटकेतील राज सिंह यास शुक्रवारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याला घेऊन पोलिसांचे पथक तपासासाठी कल्याणला रवाना होणार आहे. तिथे त्याच्या साथीदारांबा शोध घेतला जाणार आहे.