आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू, 646 जनावरे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 02:36 PM2019-05-02T14:36:43+5:302019-05-02T14:39:28+5:30
दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील आटपाडी मंडळातील तडवळे व दिघंची मंडळात आवळाई येथे या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, दोन्ही चारा छावण्यात एकूण 646 जनावरे दाखल झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली : दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील आटपाडी मंडळातील तडवळे व दिघंची मंडळात आवळाई येथे या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, दोन्ही चारा छावण्यात एकूण 646 जनावरे दाखल झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्यात पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दोन ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्या
नुसार आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. दि. 29 एप्रिल 2019 रोजी तडवळे येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीत 392 मोठी आणि 80 लहान जनावरे अशी एकूण 472 जनावरे दाखल करण्यात आली आहेत. गजानन कामगार मजूर सहकारी सोसायटी लि. आटपाडी या संस्थेने ही चारा छावणी सुरू केली आहे. तर दि. 30 एप्रिल 2019 रोजी आवळाई येथे सिद्धनाथ महिला दुग्ध व्यावसायिक संस्था, आवळाई येथे दुसरी चारा छावणी सुरू करण्यात आली असून, या चारा छावणीत 131 मोठी आणि 43 लहान जनावरे अशी एकूण 174 जनावरे दाखल करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, छावणीत दाखल झालेल्या प्रति मोठ्या जनावरास हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस प्रतिदिन 15 किलोग्रॅम किंवा वाळलेला, प्रक्रियायुक्त वाळलेला चारा 6 किलोग्रॅम किंवा मुरघास 8 किलोग्रॅम आणि आठवड्यातून तीन दिवस एकदिवसआड पशुखाद्य 1 किलोग्रॅम देण्यात यावे.
छावणीत दाखल झालेल्या प्रति लहान जनावरास हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस प्रतिदिन 7.5 किलोग्रॅम किंवा वाळलेला, प्रक्रियायुक्त वाळलेला चारा 3 किलोग्रॅम किंवा मुरघास 4 किलोग्रॅम आणि आठवड्यातून तीन दिवस एकदिवसआड पशुखाद्य अर्धा किलोग्रॅम देण्यात यावे. जनावरास चाऱ्याऐवजी ऊस द्यावयाचा झाल्यास तो अखंड न देता लहान तुकडे करून देण्यात यावा. यासाठी मोठ्या जनावरांना प्रतिदिन प्रति जनावर 90 रूपये आणि लहान जनावरांना प्रतिदिन प्रति जनावर 45 रूपये अनुदान अनुज्ञेय असणार आहे.