इस्लामपुरात खंडणीच्या गुन्ह्यातील दोघा फरारींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:45 AM2021-05-05T04:45:02+5:302021-05-05T04:45:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरामध्ये गुन्हे करून फरारी असताना पुन्हा गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोघांच्या मुसक्या गुन्हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरामध्ये गुन्हे करून फरारी असताना पुन्हा गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोघांच्या मुसक्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या. यामध्ये मोक्काच्या कारवाईतून जामिनावर असलेल्या सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे.
रोहित पंडित पवार आणि नितीन संजय पालकर (इस्लामपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
३ फेब्रुवारी २०२० ला विकास संजय पवार मित्रासमवेत दुचाकीवरून बहे रस्त्याने निघाला होता. त्या वेळी या दोघांसह इतरांनी पवार याला राजेबागेश्वर दर्गा परिसरात जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पवार याने पोलिसात फिर्याद दिली होती. या घटनेनंतर रोहित आणि नितीन फरारी होते. या फरारी काळातच रोहित पवार याच्याविरुद्ध १५ सप्टेंबर रोजी खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद आहे, तर मोक्का कारवाईतून जामिनावर आलेल्या नितीन पालकर याच्यावर २३ एप्रिलला गुन्हा नोंद आहे.
हे दोघेही किसाननगर परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे हवालदार दीपक ठोंबरे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने ही कारवाई केली. रोहित पवार याने आणखी एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दीपक ठोंबरे, प्रशांत देसाई, उमाजी राजगे, गणेश शेळके, सुनील शिंदे, आलमगीर लतीफ, वर्षा घस्ते, जवान प्रदीप पळसे, महेश डांगे यांनी कारवाईत भाग घेतला.