चांदोली धरणाचे दोन दरवाजे खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:18+5:302021-07-23T04:17:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत १८५ मिलिमीटर पावसाची नोंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे इथे अतिवृष्टी होत आहे. पाणलोट क्षेत्रातून सध्या ३० हजार क्युसेक आवक होत आहे. त्यामुळे चोवीस तासांत दोन टीएमसीने धरणातील पाणीसाठा वाढला आहे. धरणाचे दोन वक्राकार दरवाजे खुले करून सहा हजार क्युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात सुरू आहे. वारणा नदीच्या पुराने रौद्ररूप धारण केले आहे.
चांदोली धरणात पाथरपुंजपासूनच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होत असते. पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रातून सध्या सुमारे ३० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. पाण्याने सांडवा पातळी रात्रीच गाठली आहे. धरणाच्या दोन वक्राकार दरवाजांतून गुरुवारी दु. ३.३० वाजता ४ हजार ८८३ क्युसेक विसर्ग सुरू केला आहे, तर कालवा गेटमधून ११२५ क्युसेक असा सहा हजार आठ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात येत आहे. ओढ्या-नाल्याचे पाणी व धरणातील पाणी यामुळे वारणा नदीवरील चरण-सोंडोली पुलावर पाणी आले, तर आरळा-शित्तूर पूल पाण्याखाली जावून वाहतूक बंद झाली.
चांदोली धरणाच्या पाण्याची पातळी ६२२.१५ मीटर झाली आहे. पाणी साठा २९.६१ टीएमसी असून त्यांची टक्के वारी ८६.०५ अशी आहे. गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर तर दिवसभरात ७५ मिलिमीटर पावसासह एकूण १०९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत दोन टीएमसीने धरणातील पाणीसाठा वाढला आहे.
चाैकट
सतर्कतेचा इशारा
चांदोली धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.