आरफळ कालव्यात दोन मुली वाहून गेल्या, एकीचा मृतदेह सापडला; सांगली जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:17 PM2022-04-27T14:17:47+5:302022-04-27T14:18:11+5:30
कपडे धुताना आरोही कालव्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघीही बुडाल्या. त्यांची आरडाओरड ऐकून जवळच शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आरोहीला लगेच पाण्याबाहेर काढले. मात्र ती वाचू शकली नाही.
तासगाव : विसापूर (ता. तासगाव) येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली आरफळ याेजनेच्या कालव्यात पडल्या. यापैकी एका मुलीचा मृतदेह सापडला, तर दुसरीचा शाेध रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. ही दुर्दैवी घटना काल, मंगळवारी दुपारच्या दरम्यान बेरडकी मळ्याजवळ घडली. आरोही विक्रम गुजले (वय ४, रा. बांबवडे, ता. तासगाव) असे मृत मुलीचे नाव आहे, तर दुर्गा कुमार मदने (वय १८, रा. वासुंबे, ता. तासगाव) बेपत्ता आहे.
विसापूर येथील जुन्या बामणी रस्त्यावर बेरडकी मळ्यात पद्मा कुमार मदने (रा. वासुंबे) या राहतात. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या कुटुंबातील आरोही व दुर्गा या जवळच असणाऱ्या आरफळ कालव्यावर कपडे धुण्यासाठी उतरल्या होत्या. कपडे धुताना आरोही कालव्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघीही बुडाल्या. त्यांची आरडाओरड ऐकून जवळच शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आरोहीला लगेच पाण्याबाहेर काढले. मात्र ती वाचू शकली नाही. दरम्यान पाण्याला वेग असल्याने दुर्गा वाहून गेली.
दरम्यान, पोलीस पाटील संदीप पाटील व गावातील ४० ते ५० तरुणांनी गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत कालव्यात तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.
सध्या आरफळचा कालवा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे तिचा शोध घेणे कठीण झाले. घटनेबाबत पोलीस पाटील संदीप पाटील यांनी तासगाव पोलिसात वर्दी दिली. रात्री उशिरा तासगाव पाेलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलीस नाईक विजय घस्ते व पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय जाधव तपास करत आहेत.