Sangli: छत कोसळले; दगड-मातीखाली सापडलेल्या दोन बालिका बचावल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 06:23 PM2024-07-27T18:23:58+5:302024-07-27T18:23:58+5:30

ढिगाऱ्याखाली मुली सापडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला

Two girls who were found under stones and soil survived in sangli | Sangli: छत कोसळले; दगड-मातीखाली सापडलेल्या दोन बालिका बचावल्या 

Sangli: छत कोसळले; दगड-मातीखाली सापडलेल्या दोन बालिका बचावल्या 

हातनुर : हातनुर (ता. तासगाव) येथे माळवदी घराचे छप्पर कोसळून दोन चिमुकल्या मुली दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. अंधार आणि मुसळधार पावसाची तमा न बाळगता परिसरातील युवकांनी अवघ्या दहा मिनिटांत मातीचा ढिगारा बाजूला करून दोन्ही मुलींचे प्राण वाचवले. अपघातात दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. भूमी चैतन्य खुजट (वय ६) व शुभ्रा चैतन्य खुजट (वय ३) अशी जखमी मुलींची नावे आहेत. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली.

हातनुर येथे येथील सरकार वाड्यात दिवंगत स्वातंत्र्य सेनानी हरिभाऊ खुजट यांचा पूर्वीच्या काळातील माळवदी वाडा आहे. या वाड्यात सध्या त्यांच्या कुटुंबातील चैतन्य चंद्रकांत खुजट राहतात. गुरुवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांच्या दोन्ही मुली वाड्यातील माळवदी खाेलीत अभ्यास करीत बसल्या होत्या. मुसळधार पावसाने भिजलेले माळवदी छत अचानक दोघींच्या अंगावर काेसळले. यात दोन्ही मुली गाडल्या गेल्या. मोठा आवाज आल्यामुळे दुसऱ्या खोलीत स्वयंपाक करीत असलेली त्यांची आई अनुजा व शेजारच्या घरातील लोक जिवाच्या आकांताने धावले. ढिगाऱ्याखाली मुली सापडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

याचवेळी विद्युत पुरवठा खंडित झाला. अंधार व मुसळधार पाऊस यांची तमा न बाळगता मुलींच्या अंगावर कोसळलेली माती हटविण्यासाठी परिसरातील युवकांनी शर्तीचे प्रयत्न केले. योगेश खुजट, दीपक जमदाडे, किशोर पाटील, प्रतीक पाटील, रोहन पाटील, पोपट पाटील व शुभम पाटील या युवकांनी ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या १० मिनिटांत मातीचा ढिगारा उपसला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही मुलींचे श्वास गुदमरले होते. त्यांच्यावर तातडीने तासगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. दोन्ही मुलींची प्रकृती सध्या स्थिर आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल कारंडे यांनी जखमी मुलींची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

दरम्यान, घटनास्थळी तलाठी संतोष शिंदे यांनी पंचनामा केला. घरातील मोडतोड झालेल्या साहित्यासह कपडे, पुस्तके, कपाट आदींचे सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्राम विकास अधिकारी जालिंदर मोहिते यांनी तातडीने गावातील अन्य घरांचेही सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Two girls who were found under stones and soil survived in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली