कणदूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:14+5:302021-03-22T04:24:14+5:30
पुनवत : कणदूर (ता. शिराळा) येथे आनंदा बबन पाटील यांच्या शेतातील वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. शनिवारी ...
पुनवत : कणदूर (ता. शिराळा) येथे आनंदा बबन पाटील यांच्या शेतातील वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. शनिवारी (दि. १९) रात्री उशिरा हा हल्ला झाला.
दरम्यान, या वस्तीशेजारील एका गवताच्या शेतात बिबट्या लपून बसल्याचे अनेकांनी पाहिले. येथे नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाने या ठिकाणी खबरदारी घेऊन नागरिकांना पांगवले. सायंकाळी सातपर्यंत तरी बिबट्याची येथे पुन्हा कोणतीही हालचाल दिसून आली नाही.
आनंदा पाटील यांची गावाच्या पूर्वेला वारणा कालव्याच्या बाजूला वस्ती आहे. या वस्तीवर काही जनावरे व दोन शेळ्या होत्या. वस्तीवर शनिवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कणदूर येथे आठवड्यात दोन वेळा बिबट्याचा हल्ला झाला असून, नागरिक भयभीत झाले असून, शेतात जायला घाबरत आहेत. या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
दरम्यान, घटनास्थळी वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक प्रकाश पाटील, वनरक्षक देवकी ताशीलदार, क्षेत्र साहाय्यक बाबा गायकवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला.