कवलापुरात सिद्धेश्वर यात्रेत दोन गटात हाणामारी--खानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 03:32 PM2019-04-20T15:32:06+5:302019-04-20T15:32:40+5:30
कवलापूर (ता. मिरज) येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पहिल्याचदिवशी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाने काठ्या, तलवार व कुºहाडीने एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये दहाजण जखमी झाले आहेत
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पहिल्याचदिवशी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाने काठ्या, तलवार व कुºहाडीने एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये दहाजण जखमी झाले आहेत. मिरवणुकीने देवास नैवेद्य घेऊन जाताना दुचाकीचा हॉर्न वाजविल्यावरून शुक्रवारी ही घटना घडली. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता.
जखमींमध्ये सागर गणेश कांबळे (वय २९), दशरथ पोपट कांबळे (२२), सौरभ मुरलीधर कांबळे (२१), शिवाजी भीमराव खाडे (३०), राकेश सनातन कांबळे (२१), ऋतुराज मोहिते (१९), दादासाहेब अशोक कांबळे (३१), किरण केशव यादव (२४), सूरज प्रकाश माळी (२३, सर्व रा. कवलापूर) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोघांचा हात मोडला आहे, तर अन्य सर्वजणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सायंकाळी जखमींपैकी सात जणांची मिरज शासकीय रुग्णालयात सीटीस्कॅन तपासणी करण्यात आली. दोन्ही गटाच्या समर्थकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे, हवालदार संतोष माने यांच्या पथकाने कवलापूरला भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयात जखमींचे जबाब नोंदवून घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
शुक्रवारपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ झाला. पहिल्यादिवशी बैलगाडी सजवून मिरवणुकीने देवास नैवेद्य नेण्याची परंपरा आहे.
सकाळी आठपासून गावात प्रत्येक समाजाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. सिद्धेश्वर गल्लीमध्ये एक मिरवणूक थांबली होती. तेवढ्यात तेथून दुचाकीवरून दोन तरुण निघाले होते. मिरवणुकीतील बैलगाड्यांमुळे त्यांना पुढे जाता येत नव्हते. हॉर्न वाजवित त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एका बैलगाडीचा बैल उधळल्याने त्यांना या बैलाचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकीवरील तरुणांना राग आला. त्यांनी गाडीवानास, ‘बैलाचा दोरखंड व्यवस्थित ओढून धरता येत नाही का’ असा जाब विचारला. यातून त्यांच्यात भांडण झाले. काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा वाद तिथेच मिटविला होता. त्यानंतर काही वेळानंतर हे दुचाकीस्वार तरुण ५० ते ६० जणांचा जमाव घेऊन सिद्धेश्वर गल्लीत आले. त्यांच्या हातात काठ्या, कुºहाड व तलवारी होत्या. त्यांनी त्या बैलगाडीवानास शोधून मारहाण सुरू केली. दोन्ही गट आमने-सामने आल्याने त्यांच्यात जोरदार मारामारी झाली.
खानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपार
विटा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी, खानापूर तालुक्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील १३ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. यात विटा शहरातील १२ जणांचा समावेश असून वरूण विकास सावंत (रा. विटा) यास सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.
सांगली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून निवडणुकीच्या कालावधित कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी विटा ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सौ. अश्विनी जिरंगे यांच्याकडे प्रस्ताव पाठविले होते.
त्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संदीप तानाजी अडसुळे (रा. अडसरवाडी-पोसेवाडी, ता. खानापूर) यास सांगली जिल्ह्यातून एक महिन्याकरिता हद्दपार केले आहे. तसेच वरूण विकास सावंंत (रा. विटा) यास सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर सागर बबन सोनवणे, धनाजी अण्णा साठे, नितीन दादा कांबळे, लखन रामचंद्र ठोंबरे, नितीन पांडुरंग जाधव, प्रवीण सदाशिव डुबल, साजिद आमानुला आगा, दिलीप अशोक शिंदे, नितीन लक्ष्मण माने, विकास लक्ष्मण शिंगाडे व सचिन शिवाजी मेटकरी (सर्व रा. विटा) या ११ जणांना दि. १४ ते २५ एप्रिल २०१९ पर्यंत खानापूर तालुक्यातून हद्दपार केले आहे.
या ११ जणांना या कालावधित प्रवेश व राहण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.