जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 03:20 PM2020-02-06T15:20:15+5:302020-02-06T15:22:19+5:30
जीएसटीच्या आकारणीवेळी त्रुटी न काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य जीएसटीच्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
सांगली : जीएसटीच्या आकारणीवेळी त्रुटी न काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य जीएसटीच्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
राज्य कर अधिकारी राजेंद्र महालिंग खोत (वय ५७) व कर सहायक शिवाजी महादेव कांबळे (३२) अशी दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार कवठेमहांकाळ येथील असून त्यांच्या पत्नीच्या नावावर फर्निचरचा कारखाना आहे. त्यांनी तीन वर्षाचा मूल्यवर्धित कर मार्च २०१९ मध्ये आॅनलाईन पध्दतीने भरला होता.
त्यानंतर जीएसटी अधिकारी राजेंद्र खोत व शिवाजी कांबळे यांनी तक्रारदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, तुम्ही भरलेल्या मूल्यवर्धित करामध्ये त्रुटी निघण्याची शक्यता आहे. तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आम्हाला एक लाख रुपये द्या, आम्ही यामध्ये त्रुटी काढणार नाही, असे सांगितले.
तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे या दोघांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता, यात राजेंद्र खोत याच्या सांगण्यावरून शिवाजी कांबळे याने प्रथम ७० हजार व चर्चेअंती ६० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने राजनगर येथील जीएसटी कार्यालयात सापळा लावला. यावेळी खोत याने लाचेची रक्कम शिवाजी कांबळे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी ४० हजाराची रक्कम कांबळे याच्याकडे दिली. त्यावेळी छापा टाकून लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण, उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, संजय कलकुटगी, अविनाश सागर, जितेंद्र काळे, भास्कर भोरे, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, राधिका माने, सारिका साळुंखे-पाटील, अश्विनी कुकडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.
याप्रकरणी राजेंद्र खोत व शिवाजी कांबळे या दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.